सोशल मिडियात हिट झालेली ती महिला पोलिस निलंबित..  - the women who was hit on social media has been suspended | Politics Marathi News - Sarkarnama

सोशल मिडियात हिट झालेली ती महिला पोलिस निलंबित.. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

पिंपरी-चिंचवडमधील एका महिला वाहतूक पोलिसाचा प्रताप तिच्या अंगलट आला आहे.

पिंपरी : एका दुचाकीस्वार महिलेकडून लाच घेताना मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंद झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील एका महिला वाहतूक पोलिसाचा प्रताप तिच्या अंगलट आला आहे. काल सोशल मिडियात जोरदार व्हायरल झालेली ही क्लिप पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांच्यापर्यंत गेल्याने या महिलेच्या निलंबनाचे आदेश लगेचच काढण्यात आले. त्यामुळे पोलिस दलात आज खळबळ उडाली. 

थेट हातात लाच न घेता लाच देणाऱ्याला ती सूचकपणे आपल्या खिशात ठेवायला सांगते. लाच स्वीकारणाऱ्या या पोलिसाचा व्हिडिओ 'सरकारनामा'ने काल व्हायरल केला होता. तो आय़ुक्तांनी पाहिला. 

दरम्यान, याप्रकरणी सहाय्यक पोलिस आय़ुक्त श्रीकांत दिसले यांनी ही महिला कर्तव्यात असलेल्या पिंपरी वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षकांकडून अहवाल मागून घेतला होता. त्याआधारे पोलिस उपायुक्तांनी तातडीने निलंबनाची कारवाई केली. स्वाती सोन्नर असे या महिला पोलिसांचे नाव आहे. शहराच्या बाजारपेठेत पिंपरी कॅम्पात नो एंट्रीत घुसलेल्या डबलसीट महिला दुचाकीस्वाराकडून डिजीटल पद्धतीने दंड आकारण्याऐवजी या महिला पोलिसाने सदर तरुणीला आपल्या पॅंन्टच्या मागील खिशात लाचेची रक्कम ठेवण्यास सांगून ती घेतली होती.

श्रावण हर्डीकरांच्या बदलीची शक्यता.. 
पिंपरी : अपर जिल्हाधिकारी दर्जाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची पदोन्नतीवर पुण्यात बदली झाली आहे. राज्यातील इतर सहा अपर जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे. दरम्यान, पिंपरी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीचेही वारे आता जोरात वाहू लागले आहेत. त्यांचीही कधीही बदली होऊ शकते. 

अपर जिल्हाधिकारी (गट अ) संवर्गातील पाटील व इतर सहा अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या श्रेणीत बढती देण्यात आली आहे. पाटील यांची बदली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (सामान्य) या पदावर झाली आहे. त्याखेरीज भानूदास पालवे (अपर आय़ुक्त, नाशिक), अविनाश पाठक (अपर आय़ुक्त, औंरगाबाद), प्रवीणकुमार देवरे (उपआय़ुक्त, नाशिक), मिलिंद साळवे (उपायुक्त, महसूल, नागपूर), मकरंद देशमुख (उपायुक्त, कोकण, नवी मुंबई) आणि भारत बास्टेवाड (अध्यक्ष, जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, रायगड) या अपर  जिल्हाधिकाऱ्यांचेही प्रमोशन झाले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख