तरूण मुख्यमंत्री होण्याचे पवारांचे रेकॉर्ड तेजस्वी यादव मोडणार का? - will rjd leader tejashwi yadav become youngest chief minister in india | Politics Marathi News - Sarkarnama

तरूण मुख्यमंत्री होण्याचे पवारांचे रेकॉर्ड तेजस्वी यादव मोडणार का?

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून, आता निकालाची प्रतीक्षा आहे. एक्झिट पोलचा कल हा तेजस्वी यादव यांच्या बाजूने झुकणारा आहे. 

पुणे : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. हा अंदाज खरा ठरल्यास तेजस्वी यादव हे देशातील सर्वांत तरूण मुख्यमंत्री होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात सर्वांत तरूण मुख्यमंत्री होण्याचे रेकॉर्ड शरद पवार यांच्या नावावर असून बिहारमध्ये यापूर्वी सतिशप्रसादसिंह यांनी वयाच्या 32 व्या वर्षी मुख्यमंत्रिपद भूषिविले होते. तेजस्वी मुख्यमंत्री झाल्यास ते देशातील आतापर्यंतचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री ठरणार आहेत.

देशात यापूर्वी 1967 साली एमओएच फारूक हे वयाच्या 29 व्या वर्षी पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, पुदुच्चेरीला पूर्ण राज्याचा दर्जा त्यावेळीही नव्हता. त्यामुळे खऱ्या अर्थाने तेजस्वी हेच आतापर्यंतचे देशातील सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरण्याची शक्‍यता आहे. बिहारमध्ये गेल्या विधानसभेत वयाच्या 26 व्या वर्षी तेजस्वी हे पहिल्यांदा आमदार झाले होते. दुसऱ्यावेळी निवडून आल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्‍यता आहे. 

शरद पवार हे वयाच्या 37 व्या 1978 साली महाराष्ट्राचे तर अखिलेश यादव हे वयाच्या 38 व्या वर्षी 2012 साली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. बिहारचा सर्वात तरूण मुख्यमंत्री होण्याचे रेकॉर्ड सतिशप्रसादसिंह यांच्या नावावर आहे. 1968 साली ते वयाच्या 32 व्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. तेजस्वी यादव यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1989 साली झाला आहे. आज त्यांचा वाढदिवस असून, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वय हेच तेजस्वी यांच्यासाठी सर्वांत जमेची बाजू ठरण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. बेरोजगारी विरोधात त्यांनी उठविलेला आवाज आणि त्यांना तरूणांच्या मिळालेल्या प्रतिसादावरून तेजस्वी यादव यांना सत्ता स्थापन करतील, असा अंदाज सर्वच माध्यमांच्या एक्‍झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा 7 नोव्हेंबरला झाला असून, यात ७८ मतदारसंघ होते. निकाल उद्या (ता.10) जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख