उत्तम जानकरांची आमदाराकीची संधी यावेळीही जाणार ? - Will the opportunity to become a MLA of Uttam Jankar go this time too Name lags behind possible list. | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तम जानकरांची आमदाराकीची संधी यावेळीही जाणार ?

उमेश घोंगडे 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

विधान परिषदेवर जानकर यांची निवड नक्की असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून गेले वर्षभर सांगण्यात येत होते. मात्र, संभाव्य यादीत जानकर यांचे नाव कुठेच दिसत नाही.

पुणे : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादीच्या संभाव्य चार जणांच्या यादीत नांदेडचे धनगर नेते यशपाल भिंगे यांचे नाव आल्याने माळशिरसमधील आणखी एक धनगर नेते उत्तम जानकर यांचे नाव मागे पडले आहे. भाजपात असलेल्या जानकर यांनी गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत प्रवेश करीत निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा अडीच हजार मतांनी पराभव झाला होता. विधान परिषदेवर जानकर यांची निवड नक्की असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून गेले वर्षभर सांगण्यात येत होते. मात्र, संभाव्य यादीत जानकर यांचे नाव कुठेच दिसत नाही.

जानकर यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तत्कालिन भाजपा सरकारची मदत मिळाली होती. माळशिरसमधून निवडणूक लढविण्यासाठी जानकर यांन सलग पाच वर्षे काम केले होते. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर मोहिते-पाटलांच्या विरोधामुळे माळशिरसमधून त्यांना भाजपाने उमदेवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळविली. भाजपा आणि मोहिते-पाटील यांचे उमेदवार राम सातपुते यांना त्यांनी  झुंज दिली. तरीही अडीच हजार मतांनी जानकर यांचा पराभव झाला. 

या पराभवातून सावरत जानकर यांनी विधान परिषदेची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क ठेऊन त्यांनी विधान परिषदेसाठी तालुक्यात वातावरण निर्माण केले. पक्षाच्यावतीने त्यांना विधापपरिषदेसाठी शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, विधान परिषदेची वेळ आल्यानंतर प्रत्यक्षात आता वेगळेच नाव समोर आल्याने जानकर समर्थकांमध्येही अस्वस्थता आहे. जानकर यांना डावलून समाजाच्या मराठावाड्यातील नेत्याचे नाव पुढे आल्याने ही अस्वस्थता अधिक आहे. जानकर यांच्याऐवजी भिंगे यांना संधी देण्यामागे पक्षाने प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. 

भिंगे यांचा मराठवाड्यात विशेषत: नांदेडमध्ये समाजात चांगला दबदबा असल्याचे सांगण्यात येते. जानकर यांना विधानसभेला संधी दिल्याने त्यांनाच पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्याऐवजी पक्षाने भिंगे यांच्या रूपाने आणखी एका धनगर नेत्याला संधी देत समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला असल्याचे बालले जात आहे.

पक्षाच्या हितासाठी हा निर्णय घेतला असावा, असे मानले तरी यातून जानकर यांचे नुकसान नक्की होणार आहे. मोहिते-पाटलांच्या विरोधात अनेक वर्षे संघर्ष करूनही त्यांच्या हाती आमदारकी पडायला तयार नाही. विधान परिषदेची संधी गेली तर पुन्हा विधानसभेची तयारी करण्यावाचून जानकर यांच्या हाती काहीच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव जानकर यांच्या जिव्हारी लागला होता. यावेळी पुन्हा त्यांना विधानसभेसाठीच तयारी करावी लागणार असे दिसते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख