पक्षविरोधी कारवाया सहन करणार नाही, फडणविसांचा बिहारमधील भाजप नेत्यांना इशारा !  - Will not tolerate anti-party activities, Fadnavis warns BJP leaders in Bihar! | Politics Marathi News - Sarkarnama

पक्षविरोधी कारवाया सहन करणार नाही, फडणविसांचा बिहारमधील भाजप नेत्यांना इशारा ! 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

केंद्रात "एनडीए' चे मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांच्या पोराने मात्र आपल्या राज्यात नितीशकुमार यांचे काही ऐकले नाही. 

पाटणा : बिहारमध्ये "एनडीए'त फाटाफूट झाल्यानंतर भाजप आणि जेडीयू हे दोन्ही पक्ष चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहे. केंद्रात "एनडीए' चे मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांच्या पोराने मात्र आपल्या राज्यात नितीशकुमार यांचे काही ऐकले नाही. 

उलट गेल्या दोन दिवसापासून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यास सुरवात केली आहे. निवडणूक निकाल आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नितीशकुमार मुख्यमंत्री नसतील. जेडीयू जेथे जेथे लढत आहे तेथे मी आमचे उमेदवार उभे करणार कारण त्यांचा पराभव हेच माझे लक्ष असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले आहे. 

बिहारमध्ये पासवान यांच्या पक्षाला हव्या असणाऱ्या जागा न मिळाल्याने ते नाराज आहेत. ते एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरती ओवाळत आहेत तर दुसरीकडे नितीशकुमारांच्या अडचणी कशा वाढतील हे पाहत आहेत. पासवान यांचा पक्ष स्वतंत्र लढत आहे. त्यातच भाजपच्या नाराज नेत्यांनी लोकजनशक्ती पक्षात प्रवेश करायला सुरवात केली आहे. त्यामुळे नितीशकुमार हे नाराज झाल्याचे समजते. मात्र राज्यातील भाजपची सर्व नेतेमंडळी पुन्हा पुन्हा एकच सांगत आहेत की जरी भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमारच आमचे मुख्यमंत्री असतील. 

आता दोन्ही पक्षांनी पासवान यांच्या पक्षाला लक्ष्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरल्यास कारवाई करू असा इशारा दिला आहे. मोदींची छबी वापरून त्याचा फायदा आमच्या विरोधकांना घेऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले आहे. 

पासवान यांचा पक्ष "एनडीए'त नसल्याने आता जेडीयू आणि भाजपने निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आज याच मुद्यावर झालेल्या पत्रकार परिषदेतला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी सांगितले, की जर भाजपचा कोणताही नेता लोकजनशक्ती पक्षाकडून लढला तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. त्याला पक्षातून निलंबित करण्यात येईल. पक्षविरोधी कारवाया अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. तसे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. 

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उषा विद्यार्थी यांनी कालच पासवान यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्या मुद्यावर लक्ष वेधत फडणवीस यांनी हा इशारा दिला आहे. पालिगंज मतदारसंघातून उषा ह्या जेडीयूचे उमेदवार जयवर्धन यादव यांच्याविरोधात लढणार आहेत. 2010 मध्ये उषा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख