वळसे पाटलांचा फडणवीस यांना इशारा : अशा गोष्टी पुन्हा सहन केल्या जाणार नाहीत...

रेमडिसिवर इंजेक्शनवरून राजकीय वाद जोरात
walase patil-fadnavis
walase patil-fadnavis

मुंबई : रेमडिसिवर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी काल पोलिसांनी बोलवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयात धाव घेऊन संबंधित मालकाला सोडविले. त्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे.

पोलिस चौकशीसाठी कोणालाही बोलवून शकतात. पोलिसांवर असा दबाव टाकणे योग्य नाही. विरोधी नेत्यांनी शासकीय कामात हस्तक्षेप केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांसमोर सवाल उपस्थित केले. मात्र असा सवाल विरोधी पक्षाला उपस्थित करता येत नाही, असा दावा वळसे पाटील यांनी केला. पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांवर काय कारवाई करता येईल याची चौकशी करून निर्णय घेतला जाईल, वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, पराग आळवणी आदी या वेळी पोलिस उपायुक्त कार्यालयात गेले होते. संबंधित मालकाला न सोडल्यास आंदोलनाचा इशाराही भाजपने दिला होता. त्यामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र त्यानंतर पोलिस स्टेशनमधील संभाव्य वाद थांबला असून त्यावर आता राजकीय टिप्पण्या सुरू झाल्या आहेत. 

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी स्वतंत्रपणे प्रसिद्धपत्रकाद्वारे कालच्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. रेमडिसिवर इंजेक्शनच्या साठ हजार कुप्यांचा साठा या कंपनीकडे असल्याची माहिती बीकेसी पोलिस ठाण्याला मिळाली होती. त्यामुळे संबंधितांची चौकशी आवश्यक होती. या चौकशीची कल्पना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना होती. रात्री पावणे बाराच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार पराग आळवणी हे बीकेसी पोलिस ठाण्यात आले. फडणवीस यांनी पोलिसांना सांगितले की या इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला देण्यास `एफडीए`कडून परवानगी देण्यात आली होती. कारण निर्यातीसाठी ठेवलेला साठा हा देशाचे औषध नियंत्रक किंवा एफडीए आयुक्त यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळवता येऊ शकत नाही. एफडीएकडून या कंपनीला दिलेली परवानगीची कल्पना पोलिसांना देण्यात आलेली नव्हती. पोलिस त्यांना मिळालेल्या माहितीवर स्वतंत्रपणे काम करत होते. मुंबई पोलिसांनी सदभावनेने काम केले. साठ हजार इंजेक्शनची माहिती घेण्यासाठी संबंधित मालकाला बोलविण्यात आले होते. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी ही चौकशी आवश्यक होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

ही वस्तुस्थिती फडणवीस यांना समजावून देण्यात आली. तसेच या इंजेक्शनवर बेकायदा स्टिकर किंवा होर्डिंग लावल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांना देण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. संबंधित मालकाकडे चौकशी केल्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आले तसेच वेळ पडेल तेव्हा चौकशीस हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com