नीतीशकुमारांचं इमोशनल कार्ड चालणार की 'पॅक' होण्याची वेळ येणार? - Will Nitish Kumar's emotional card work or will it be time to 'pack'? | Politics Marathi News - Sarkarnama

नीतीशकुमारांचं इमोशनल कार्ड चालणार की 'पॅक' होण्याची वेळ येणार?

अमोल कविटकर
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

बिहारचे मैदान कोण मारणार? हा प्रश्न अवघ्या देशाला पडला आहे.

पाटणा : 'आज निवडणुकीचा शेवटचा दिवस असून ही माझी शेवटची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सगळंच चांगलं', अशा प्रकारे भावनिक साद घालून विद्यमान मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता केली. 

धमदाहा येथे शेवटची प्रचार सभा घेत नीतीश कुमार यांनी खेळलेले इमोशनल कार्ड चालणार की स्वतःच्याच इमोशनल कार्डवर पॅक होण्याची वेळ त्यांच्यावर येणार? याचा निकाल काहीच तासात मिळणार आहे. 
 
बिहारचे मैदान कोण मारणार? हा प्रश्न अवघ्या देशाला पडला आहे. एकीकडे मुरब्बी असलेले विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार आणि समोर अवघ्या ३० वर्षांचे विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव.

 तेजस्वी यांच्या प्रचाराच्या झंझावाताने कडवं आव्हान उभं राहिल्यानंतर नितीशकुमार यांनी शेवटच्या सभेत इमोशनल कार्ड खेळत ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं म्हटलंय.

पायाला अक्षरशः भिंगरी लावून फिरलेल्या तेजस्वी यांच्या सभांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरही तुफान गर्दी झाली. 

नीतिशकुमार यांची सर्व यंत्रणा आणि सोबत भाजपचं मॅनेजमेंट असतानाही तेजस्वी सरस राहिले. म्हणूनच शेवटच्या टप्प्यात नीतिशकुमार यांना इमोशनल कार्ड खेळावं लागलं. 'ही माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगताना 'अंत भला तो सब भला' असं सूचक वक्तव्यही बोलून गेले.

नीतीशकुमार यांच्या या इमोशनल कार्डवर जेडीयुलाच सावरासावर करण्याची वेळ आली असून विरोधकांनी नीतीशकुमार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण जेडीयुने दिले आहे. 

याबाबत जेडीयुचे प्रदेश सचिव डॉ. नवीन कुमार आर्या म्हणाले, 'राजकारणात निवृत्ती नसते. नेते कधीही निवृत्त होत नाहीत. नीतीश कुमार यांनी आपल्या राजकारणाचा नाही, तर  स्वतःची शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले आहे.'

नितीशकुमार यांच्या इमोशनल कार्डवर मात्र राष्ट्रीय जनता दलाने थेट हल्ला केला आहे. 

यावर तेजस्वी म्हणाले, 'नितीशकुमार थकले असल्याचे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आता तर त्यांनीच स्वतः मान्य केले आहे.

तेजस्वी यादव यांनी यंदा सर्वाधिक २५१ सभा घेतल्या. तुलनेत नीतीश कुमार यांनी अवघ्या ११३ सभा घेतल्या. भाजपच्या २९ नेत्यांनी ६५० सभा घेऊन खिंड लढवली. पण तरीही यात चमक दिसली ती तेजस्वी यादव यांचीच. नीतिशकुमार यांची तर हीच खरी डोकेदुखी ठरली आहे. म्हणूनच शेवटच्या टप्प्यातील ३५ जागांवर डोळा ठेऊन नीतीशकुमार यांनी इमोशनल कार्डची खेळी खेळल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख