खडसेंचे राष्ट्रवादीत यायचे तर ठरले... पण राष्ट्रवादीतील कोणता मंत्री त्यांच्यासाठी घरी जाणार? - Will the NCP's minister from Western Maharashtra have to resign for inclusion of Khadse in ministry | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंचे राष्ट्रवादीत यायचे तर ठरले... पण राष्ट्रवादीतील कोणता मंत्री त्यांच्यासाठी घरी जाणार?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश आणि मंत्रीमंडळ फेरबदलाच्या चर्चेने सध्या राजकीय वर्तुळात वादळ 

पुणे : भारतीय जनता पक्षाते नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश शुक्रवारी निश्चित झाला असल्याने त्यांना राष्ट्रवादी काॅंग्रेस मंत्रीपद देणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेने राष्ट्रवादीतील मंत्र्यात चलबिचल आहे. त्यातही पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील एखाद्या मंत्र्याला खडसेंसाठी मंत्रिपदाचा त्याग करावा लागतो की काय, याबाबत दबक्या आवाजात बोलले जात आहे. जळगावमधील खडसेंचे समर्थक पद सोडाव्या लागणाऱ्या मंत्र्याचे नावही सांगत आहेत. 

महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्रीपदाच्या सर्व जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोणाला नवीन मंत्री करायचे असेल तर विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला तरी राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यात खडसेंना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे लागणार असल्याने राष्ट्रवादीच्या कॅबिनेट मंत्र्याचेच पद जाऊ शकते. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्याला तर त्यासाठी तर तयार केले जाणार नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. पक्षाची पश्चिम महाराष्ट्रात चांगली ताकद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे कॅबिनेट तर दत्तात्रेय भरणे हे राज्यमंत्री आहेत.

खडसेंच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रात मंत्रीपद पक्षाला द्यावे लागणार आहे. इतर विभागांत पक्षाकडे एक-दोन मंत्रीपदे आहेत. त्यातील कोणाचा नंबर खडसेंसाठी लागण्याचीही शक्ता नाकारता येत नाही. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या माध्यमात चर्चेत आहेत. ते मंत्रीपद सोडून केवळ प्रदेशाध्यक्षपदावर समाधान मानणार का, यावरही चर्चा होत आहे. आव्हाड हे मंत्रीपद सोडून संघटनेसाठी आले तर मग इतर मंत्र्यांचे पद वाचू शकते, असे एका नेत्याने सांगितले.  

खडसेंना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्याचे आणि सोबत मंत्री करण्याचे अशी दोन्ही आश्वासने देण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंनी प्रवेशासाठी कोणतीही अट लादली नसल्याचे स्पष्ट केले पण राजकारणात कोणतीही अट नसताना प्रवेश करणारे फारच कमी आहेत. त्यामुळेच खडसे यांना कोणते मंत्रीपद मिळणार आणि त्याबदल्यात कोणाचे जाणार, याची उत्सुकता आहे. शिवसेनेकडील कृषी खाते घेऊन त्या बदल्यात राष्ट्रवादीकडील गृहनिर्णाण खाते देण्याचीही चर्चा आहे. हे कृषी खाते खडसेंना मिळण्याची शक्यता आहे. मात्र अशी अदलाबदल झाली नाही तर राष्ट्रवादीकडे सध्या असलेल्या मंत्र्यांकडीलच एखादे खाते त्यांना मिळेल. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख