मोदी व पवार भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र येणार का? - will NCP and BJP come together is the question | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मोदी व पवार भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र येणार का?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 जुलै 2021

मोदी आणि पवार भेटीनंतर राजकीय वादळ... 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज दिल्लीत झालेली भेट राजकीय खळबळ उडवून गेली. सहकारी बॅंकांसदर्भातील कायद्यातील बदल आणि कोरोना स्थितीचा मुकाबला यावर या दोन्ही नेत्यांत भेटी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसने केला असला तरी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला गेला. (Sharad Pawar meets PM Narendra Modi)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले. भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस हे एका नदीचे दोन किनारे आहेत. जसे दोन किनारे एकमेकांना कधीच भेटू शकत नाहीत किंवा एकत्र येऊ शकत नाही, तसे आम्ही दोन्ही पक्ष एकत्र काम करणार नाही. भाजपचा राष्ट्रवाद आणि आमचा राष्ट्रवाद यात फरक आहे. त्यामुळे भाजपशी राजकीय सख्य असण्याचे कारण नाही. राजकारणात वैयक्तिक मैत्री असू शकते, भेटी होऊ शकतात याचा अर्थ राजकीयदृष्ट्या ऐकत्र येणार आहे, असा नाही.

वाचा ही बातमी : पवार गेले नरेंद्र मोदींच्या भेटीला...

महाराष्ट्रात 2019 मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी पवार आणि मोदी या दोन्ही नेत्यांत भेटी झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मी मोदी यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचे त्या वेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले होते. प्रत्यक्षात त्या वेळी दोन्ही नेत्यांत महाराष्ट्रात दोन्ही पक्षांचे एकत्रित सरकार स्थापन करण्याची चर्चा झाली होती. अशी चर्चा झाल्याचे पवारांनीच ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर स्पष्ट केले होते. या घटनेची आठवण मलिक यांना पत्रकारांनी करून दिली असता त्यांनी पवार यांची भेट ही तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच झाली होती. त्यावेळी मोदींनी भाजपसोबत येण्याची आॅफर दिली होती. मात्र राष्ट्रवादीने ती नाकारली होती, असा दावा मलिक यांनी केला. सध्याचे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचाही दावा त्यांनी केला. . महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवार यांचीही काल दिल्लीत भेट झाल्याची अफवा पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे अनेक नेते सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईत अडकले आहेत. त्या संदर्भात या दोन नेत्यांची काही चर्चा झाली का आणि ईडीच्या कारभाराबद्दल पंतप्रधानांकडे पवारांनी तक्रार केली का, या प्रश्नावर मलिक म्हणाले की खुद्द पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी देखील पवार यांनी मोदींच्या कानावर हे घातले नव्हते. सध्याच्या ईडीच्या कारवाया म्हणजे राजकीय सूड उगविण्याचा प्रकार आहे. त्यामुळे याबाबी मोदींना सांगण्याची गरज नाही. आमचे नेते यातून सुटतील. त्यांना न्याय मिळेल, असे मलिकांनी सांगितले

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवाईबाबत मलिक म्हणाले की काल ईडीने प्रेसनोट काढून देशमुख यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या फ्लॅट आणि जमीन सील केल्याची माहिती दिली.  प्रत्यक्षात या मालमत्तेची खरेदी ही 2004 व 2005 या सालातील आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने आता पैसे दिल्याचा दावा यंत्रणा करते. त्यातून मनी लाॅंड्रींग झाले असल्याचे सांगून आधीच घेतलेल्या मालमत्ता सील केल्या जातात, याचा अर्थ तपास यंत्रणा या दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येत आहे. कशा पद्धतीने यंत्रणा काम करत आहे, हे स्पष्ट आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख