शरद पवार यांनी दिलेला सल्ला यशोमती ठाकूर यांना का झोंबला?

उपयुक्त सल्ला ऐकणे नेहमीच भल्याचे असते.
yashomati thakur
yashomati thakur

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काॅंग्रेसच्या नेत्याला दिलेला सल्ला महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना चांगलाच झोंबला आहे. त्या रागातून त्यांनी काॅंग्रेस नेत्यांवर टीका करू नका नाही तर महाविकास आघाडी सरकार धोक्यात येईल, असा थेट इशारा दिला. खरे तर काॅंग्रेसच्या मंडळींनी चिडावे, असे शरद पवार काहीच बोलले नाहीत. तरीही ठाकूर यांनी राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या विरोधात अचानक भूमिका घेतली. महाविकास आघाडी सरकारची पहिली परीक्षा असलेल्या विधान परिषद निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा संदेश गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकूर यांनी ठिणगी लावण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांच्या धोरणात सातत्य नसते, हे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. शिवसेनेचे नेते संजय राऊतही अधुनमधुन अशाच आशयाचे बोलतात. काॅंग्रेस गोंधळलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. राहुल यांनी पक्षात जबाबदारी घ्यावी, अशी मागणी काॅंग्रेस नेते गेल्या चार-पाच महिन्यांपासून करत आहेत. सोनिया गांधी या आजारी असतानाही त्यांना पक्षाचा कारभार हाकावा लागत आहे.  हैदराबादच्या महापालिका निवडणुकीत भाजप आपले बडे केंद्रीय मंत्री उतरवतो आणि जिद्दीने तेथे पाय पायाभरणी करतो. काॅंग्रेसच्या मंडळींकडे अशी जिद्द काही दिसत नाही. त्यामुळेच पक्षाला नशिबाने अच्छे दिन येतील, या भरवश्यावर कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वहिनतेचा  गोंधळ संपवावा म्हणून पत्र लिहिले. त्याचीही दखल कोणी घेत नाही आणि ज्यांनी पत्र लिहिले त्यांनाही अडगळीत टाकले. आपल्या मित्रपक्षाविषयी  शरद पवार यांनी तर वडिलकीचा सल्ला दिला होता. हा सल्लाही काॅंग्रेस नेत्यांना टीका वाटत असेल तर ही मंडळी वास्तवापासून लांब असल्याचे स्पष्ट होत आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे काही या विषयावर अधिकृतरित्या बोलले नाहीत. पण कार्याध्यक्ष असलेल्या ठाकूर यांनी प्रतिक्रिया देऊन राहुल गांधी यांच्याविषयीची निष्ठा दाखविण्यात पहिला क्रमांक मिळवला, असाही त्याचा अर्थ निघतो. आघाडी सरकार चालविताना एकमेकांविषयी टिप्पणी म्हणजे अविश्वास किंवा टीका नव्हे. मात्र थोरात हे आक्रमक नेेते नसल्याने या महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्षाची कोंडी होत असल्याची भावना काॅंग्रेसच्या मंत्र्यांत आहे. काॅंग्रेसच्या मंत्र्यांना सरकारमध्ये कमी निधी मिळत असल्याची त्यांची तक्रार आहेच. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा सरकारने मनावर घेतली नाही आणि त्यासाठी निधीही मंजूर केला नाही. तसेच आदिवासींसाठीच्या योजनांच्या निधीत कपात झाल्याची तक्रार आहे. त्याविषयीची खदखद ठाकूर यांना या ट्विटमधून व्यक्त केली असण्याची शक्यता जास्त आहे. पण त्यासाठीचे कारण त्यांनी जे शोधले आहे, ते मात्र चुकीचे आहे. ज्येष्ठ नेत्याने वडिलकीचा दिलेला सल्ला हा काॅंग्रेसच्या नेत्यांना उपयुक्तच ठरणारा आहे. त्यांनी तो आपल्या शीर्षस्थ नेत्यांपर्यंत पोहोचावा. त्यातच पक्षाचे आणि राज्यातील काॅंग्रेस नेत्यांचेही भले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com