सचिन वाझेंना ठाकरे सरकार अटक का करत नाही ?.. सोमय्यांचा सवाल  - Why Thackeray government is not arresting Sachin Waze Kirit Somaiya | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सचिन वाझेंना ठाकरे सरकार अटक का करत नाही ?.. सोमय्यांचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंनी आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. 

मुंबई :  मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांना अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबतचे टि्वट सोमय्या यांनी केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये किरीट सोमय्या म्हणतात, "शिवसेनचे माजी प्रवक्ता पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. एटीएस चा आत्ता निष्कर्ष आहे की मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे. मग ठाकरे सरकार सचिन वाझे यांना अटक का करत नाही."

सचिन वाझे याच्यासारख्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सरकार इतके का घाबरते असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. या सरकारचे असे नेमके काय गुपीत त्याच्याकडे आहे जे सरकारला त्रासदायक आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 18 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांची मुंबई क्राईम ब्रँचमधून नागरी सुविधा केंद्रात काल बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वाझे यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधीमंडळात केली होती. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी जिलेटिन भरलेली गाडी सापडली त्याबद्दलचा तपास केंद्रीय गृहखात्याने कालच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला. हिरेन यांच्या ताब्यातील ही गाडीच अंबानी यांच्या घरासमोर होती. त्यानंतरच हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास सुरवातील सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यामुळे हिरेन आणि वाझे यांचे संभाषण झालेले होते. त्यानंतरच वाझे यांचे नाव गेले काही दिवस चर्चेत होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे थेट वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंनी आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख