बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची संधी भाजपने का सोडावी !  - Why should BJP give up the opportunity of Bihar Chief Minister's post! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची संधी भाजपने का सोडावी ! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

आज संधी मिळाली आहे. ती संधी तरी भाजपने का सोडावी ? बिहारमध्ये आजपर्यंत भाजपचा मुख्यमंत्री कधीच बनला नाही. तसेच इतक्‍या प्रमाणात जागाही आल्या नव्हत्या. बिहार हे तुलनेने मोठे राज्य आहे. यूपी, बिहारची वोट बॅंक भाजप सोडेल असे वाटत नाही. 

 बिहार विधानसभा निवडणुकीत "एनडीए'ला स्पष्ट बहुमत मिळाले तर नितीशकुमार मुख्यमंत्री होतील का ? याबाबत आताच काही स्पष्टपणे सांगता येत नाही.तसेच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराही पुढे आलेला दिसत नाही. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळते की महाराष्ट्राप्रमाणे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा तरूण चेहरा पुढे आणतात याकडेही देशाचे लक्ष लागले आहे. 

जर भाजपला अधिक जागा मिळूनही दिल्लीतील भाजप नेतृत्वाने पुन्हा नितीशकुमारांना संधी दिली तर सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्री बनतील. भाजपला महत्त्वाची खाती द्यावी लागतील हे स्पष्टच आहे. गृहसह वजनदार खाती भाजप आपल्याकडे ठेवू शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की बिहारमध्ये सुशीलकुमार मोदी हे अनेक वर्षापासून भाजपचे प्रमुख म्हणून सत्तेत आहे.

आजपर्यंत त्यांनी भाजपला विजयापर्यंत नेण्यासाठी विशेष असे प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. यावेळेला राज्यात मोदींची जादू चालल्याचे दिसून येते. निकाल येण्यासाठी काही तास लागणार असले तरी बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? हे दिसत नाही. 

भाजपने प्रत्येक राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देताना धक्कादायक निर्णय घेतले आहे. महाराष्ट्रात जेव्हा भाजपने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना वाटत होते की, आपणास मुख्यमंत्री केले जाईल. मात्र भाजपने फडणवीस यांचे नाव पुढे केले आणि खडसेंचे स्वप्न भंगले. 

सत्ता आल्यानंतर फडणवीस हे अधिक आक्रमक बनले. त्यांनी पक्षातील आपल्या विरोधकांना ज्या ठिकाणी ठेवायचे तेथेच ठेवले. खडसे तर शेवटी पक्षाबाहेर पडले आहेत. आज ते राष्ट्रवादीत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जे ठरवतात तेच होते. बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री होतील असे चित्र दिसत नाही. समजा जेडीयूला भाजपपेक्षा अगदी आठदहा जागा कमी मिळाल्या असत्या तर नितीशकुमार मुख्यमंत्री बनले असते. आजचे चित्र मात्र भाजपच्या बाजूने गेल्याचे दिसते. जेडीयू आणि भाजपने जिंकलेल्या जागा पाहता भाजपचे दुपट्टीने राज्यात वजन वाढले आहे. भाजपला समजा जर 80 जागा मिळाल्या आणि जेडीयूला 50 जागा मिळाल्या तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडेल असे वाटत नाही. 

बिहारमध्ये लहान भाऊ असलेला भाजप आता मोठा भाऊ झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचा मोठा भाऊ बनताना भाजपने युती तोडण्यासही मागे पुढे पाहिले नव्हते. शेवटी महाराष्ट्रात युती तुटलीच. नितीशकुमारांना भाजप लगेच दुखावणार नाही. पण, संधीही सोडेल असे वाटत नाही. 

जर नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले नाही तर भाजप संधीसाधू आहे हा संदेश देशात जावू शकतो. मात्र मिळालेल्या जागा पाहता भाजपवर कोणी टीका करणार नाही. जेडीयू आणि भाजपला मिळालेल्या जागांमध्ये मोठी तफावत आहे.

आज संधी मिळाली आहे. ती संधी तरी भाजपने का सोडावी ? बिहारमध्ये आजपर्यंत भाजपचा मुख्यमंत्री कधीच बनला नाही. तसेच इतक्‍या प्रमाणात जागाही आल्या नव्हत्या. बिहार हे तुलनेने मोठे राज्य आहे. यूपी, बिहारची वोट बॅंक भाजप सोडेल असे वाटत नाही.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख