शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने  कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला.. ?  - Why Shiv Sena NCP support  the Agriculture Bill | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने  कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला.. ? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा का दिला ? याचा खुलासा त्यांनी करावा, असे आव्हान  प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

पुणे : राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकाला राज्यसभेत काल मंजुरी मिळवून देण्यात अखेर केंद्रातील भाजप, आरएसएसच्या नरेंद्र मोदी सरकारला यश आले. शेतकऱ्यांचे सुगीचे-दिवाळीचे दिवस संपले आहे. आता त्यांना हमीभाव मिळणार नाही. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा का दिला ? याचा जाहीर खुलासा त्यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयक सभागृहात मांडली. यानंतर अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी तिन्ही विधेयकांना विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील खासदारांनी राज्यसभेच्या वेलमध्ये येऊन प्रचंड गोंधळही घातला. शेवटी मोदी सरकारला आवाजी मतदानाद्वारे तीनपैकी दोन विधेयके मंजूर करवून घेण्यात यश आले. 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज तीन कृषी विधेयक बिल आणुन त्यापैकी 2 बिल मंजूर करून घेतले. हे विधेयक आणताना शेतकऱ्यांना असे सांगण्यात आले होते की, तुमचे सुगीचे दिवस आले आहे. म्हणजेच काय ? तर तुमचा माल तुम्हाला कुठेही विकता येईल. मात्र,  शेतकऱ्यांना काय माहिती की, कुठल्या शेतीच्या मालाला कुठे जास्त भाव मिळतो. हे माहीत नसल्यामुळे हे विधेयक फसवे असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

आताची परिस्थिती अशी आहे की, बाजार समित्यांमार्फत हमी भाव ठरवले जात होते व त्यांच्या मार्फतच विकत घेण्याची सुविधा होती. आता मात्र, कुठेही माल विका पण आता हमी भाव ही कल्पना संपली आहे. शेतकरी व व्यापारी जो ठरवतील तोच भाव अंतिम राहील. त्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन राहणार नाही. त्यामुळे हे विधेयक फसवे असून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोघांना आव्हान आहे की, त्यांनी या विधेयकाला पाठिंबा का दिला. याचा जाहीर खुलासा करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार मोर्चेबांधणी करीत तीन कृषी विधेयक राज्यसभेत मांडली. या विधेयकांवरून विरोधकांनी देशभर वातावरण तापवले. या विधेयकाला विरोध करून नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर किसान विरोधी नरेंद्र मोदी ही हॅशटॅग मोहीम सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या विधेयक म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात काळा कायद्दा असल्याचं म्हटलं आहे. 

याबाबत राहुल गांधी टि्वट केलं आहे. या कृषी विधेयकांबाबत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना काही प्रश्न केलं आहे. राहुल गांधी यांच्या टि्वटला गुजरातमधील काँग्रेसचे युवा नेते हार्दीक पटेल यांनी रिटि्वट करून म्हटलं आहे की असे प्रकार सुरूच राहणार का ?, सत्ताधारी राजकारण करून शेतकऱ्यांना छळत राहणार का ?

राहुल गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्यांनी भांडवलदारांचे गुलाम बनविण्याची काम मोदी करीत आहेत. या विधेयकाच्या विरोधात आणि बाजूनं अनेक टि्वट केलं जात आहे. सोशल मीडियावर या विधेयकांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. 

देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. मोदी सरकारने ही विधेयके संमत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ही बहुचर्चित तीन कृषी विधेयके आज राज्यसभेत मांडण्यात आली. विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच सरकारने आवाजी मतदानाने ही तिन्ही विधेयके मंजूर केली. या विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर शेतकरी मुक्त झाल्याचे म्हटले आहे. याचबरोबर हमीभावाबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख