Why is the people's representative silent about Jalgaon central bank loan disbursement? | Sarkarnama

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक कर्जवाटपाबाबत लोकप्रतिनिधीचे मौन का?

कैलास शिंदे 
गुरुवार, 2 जुलै 2020

शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जिल्हा बॅंकेत सदस्य आहेत. त्यांचे याबाबतीत मौन का आहे ? असा प्रश्‍न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

जळगाव : जिल्हा बॅंकेतर्फे शेतकऱ्यांना केवळ 50टक्केच कर्जवाटप करण्यात येत आहे. याबाबत शेतकऱ्यांची तक्रार आहे. पालकमंत्रीही नाराज आहेत. मात्र, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जिल्हा बॅंकेत सदस्य आहेत. त्यांचे याबाबतीत मौन का आहे ? असा प्रश्‍न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

जळगाव जिल्हा बॅंकेवर भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. मात्र, बॅंकेच्या सत्ताधारी गटात सर्वपक्षाचे सदस्य आहेत. चेअरमन निवडीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही पाठींबा आहे. विशेष म्हणजे व्हाईस चेअरमन शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी गटातील आमदार जिल्हा बॅंकेत सत्ता असलेल्या गटात आहेत.

जळगाव जिल्हा बॅंकेतर्फे शेतकऱ्यांना केवळ 50 टक्केच पीक कर्जवाटप करण्यात येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनीही शंभर टक्के कर्ज देण्याची मागणी केली आहे. मात्र, जिल्हा बॅंक शेतकऱ्यांची दखल घेण्यास तयार नाही. विशेष म्हणजे पीक कर्जमाफी अंतर्गत अनेक शेतकरी शंभर टक्के कर्ज घेण्यास पात्रही आहेत. शेतकऱ्यांना केवळ 50 टक्के पीक कर्ज द्यावे, असा राज्यात कोणत्याही जिल्हा सहकारी बॅंकेत नाही. एकमेव जळगाव जिल्हा बॅंकतर्फे हा नियम काढण्यात आला आहे. त्यामुळे बॅंकेतर्फे पीक कर्जवाटप अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी इतर बॅंकाकडे किंवा सावकाराकडे जावे लागत आहेत.

जिल्हा बॅंकेच्या या कर्जवाटप धोरणाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी नाराजी दाखविली आहे. आता या बाबत राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीतही ते कमी कर्ज देण्याबाबत बॅंकेवर कारवाईची मागणी करणार आहेत. मात्र, आता बॅंकेच्या या धोरणाबाबत जिल्हा बॅंकेत संचालक असलेले सत्ताधारी शिवसेना व राष्टवादी कॉंग्रेसचे गप्प का आहेत, असा प्रश्‍नही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
 
व्हाईस चेअरमन पाटलांचे मौन

शिवसेनेचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे जिल्हा बॅंकेचे व्हाईस चेअरमन आहेत.एकेकाळी त्यांनीच जिल्हा बॅंकेबाहेर बॅंकेच्या कारभारविरूध्द ढोल बजाव आंदोलन केले होते. आज व्हाईस चेअरमन असतांना ते कमी पीक कर्जवाटपाबाबत काही बोलण्यात तयार नाहीत.
 
सहकार तज्ज्ञ आमदार चिमणराव पाटील गप्प

शिवसेनेचे पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत, त्यांना सहकार क्षेत्रातील ते जाणकार आहेत. जिल्हा बॅंकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एकेकाळी विरोधात असतांना ते बॅंकेच्या कार्यकारी मंडळाची सभा झाली कि पत्रकार परिषद घेवून आवाज उठवित होते. परंतु आता मात्र तेही याबाबत बोलण्यास तयार नाहीत.
 
आमदार अनिल भाईदास बोलणार कधी?

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि सहकार हे अत्यंत जवळचे नातं असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील आहेत. विशेष म्हणजे ते सुध्दा जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. मात्र, त्यांनी सुध्दा या कमी पीक कर्जवाटपाबाबत अद्यापही आपले मौन सोडलेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर हे सुध्दा जिल्हा बॅंकेचे संचालकही आहेत. त्यांनी सुध्दा शंभर टक्के पिक कर्जवाटप करावे, याबाबत आवाज उठविला नाही.

 
गिरीश महाजनांचे आंदोलन कधी?

राज्यात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आहे. माजी मंत्री गिरीश महाजन हे सुध्दा जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ते आंदोलन करतांना मात्र जिल्हा बॅंकेतर्फे होत असलेल्या कमी कर्जवाटपाबाबत ते सुध्दा मौन बाळगून आहे. गिरीश महाजन जिल्हा बॅंकेसमोर आंदोलन कधी करणार याबाबतही आता प्रश्‍न उपस्थित होत आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख