सोनिया गांधी रुग्णालयात असतानाच पत्र का पाठविले, राहुल गांधींचा सवाल !  - Why did Sonia Gandhi send the letter while she was in hospital, Rahul Gandhi's question! | Politics Marathi News - Sarkarnama

सोनिया गांधी रुग्णालयात असतानाच पत्र का पाठविले, राहुल गांधींचा सवाल ! 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड होण्यापर्यंत सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावर राहावे अशी विनंती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि ए.के. ऍन्टोनी यांनी केली आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात उपचार घेत असताना पक्षाच्या नेतृत्वावरून पत्र का पाठविले असा सवाल कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला असल्याचे समजते. 

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना अजूनही वाटते सोनिया गांधींनीच पक्षाचे नेतृत्व करावे तर काही नेत्यांना वाटते की पुन्हा राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार विरोधात लढायचे असेल सक्षम विरोधीपक्ष असायला हवा अशी भूमिका पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी घेतली आहे. त्यांनाही असे वाटते की सोनिया यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे. 

ज्यांनी पक्षाच्या नेतृत्वावरून पत्र लिहिले त्या पत्राची आज कॉंग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. ज्यांनी हे पत्र लिहिले होते त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. काही नेत्यांनी तर पत्र लिहिणाऱ्यांच्या विरोधात मोहीमच सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे खुद्द सोनिया यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जर त्यांनी अध्यक्षपदावर न राहण्याचा निर्णय घेतला तर पुढचा अध्यक्ष कोण याचीही उत्सुकता देशभर आहे. 

प्रियंका गांधी यांनी काही दिवसापूर्वी म्हटले आहे, की आमच्या घराण्यातील कोणीही आता कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही. तसे झाले तर कॉंग्रेसचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्‍न आहे. पण, कॉंग्रेसला जीवंत ठेवायचे असेल तर गांधी घराण्यातील व्यक्तीच अध्यक्ष हवी अशी भूमिकाही काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

आजच्या कॉंग्रेसच्या बैठकीला सुरवात झाली तेव्हा सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेते के. सी. वेणूगोपाळ यांना एक नोट दिली. या नोटमध्ये ज्या नेत्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्यावरून पत्र लिहिले होते. त्याला या नोटमध्ये उत्तर देण्यात आले आहे. ते ही नोट बैठकीत वाचून दाखविणार आहेत. 

आजच्या बैठकीत मात्र राहुल गांधी यांच्या निशाण्यावर ज्यांनी पत्र लिहिले असे नेते होते. त्यांचे म्हणणे असे होते की सोनिया गांधी आजारी होत्या. त्या रुग्णालयात असताना नेमके पत्र कसे काय आले. पत्र पाठविण्याच्या वेळेवरून राहुल यांनी पत्र पाठविणाऱ्या नेत्यांवर टीका केल्याचे समजते.

मात्र पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड होण्यापर्यंत सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावर राहावे अशी विनंती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि ए.के. ऍन्टोनी यांनी केली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद असले तरी बहुतांशी नेत्यांना राहुल यांनीच पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे असे वाटते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख