पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटमधील उमेश पाटील कोण? - who is Umesh Patil who involved in transfer racket of police officers | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटमधील उमेश पाटील कोण?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

या अहवालावरून सध्या राजकीय साठमारी? 

पुणे : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करणारा आणि त्यासाठी काही मंडळींनी पैशाची देवाणघेवाण केल्याचा आरोप करणारा राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अहवालात उमेश पाटील या व्यक्तीचा उल्लेख येत आहे. हे उमेश पाटील कोण अशी चर्चा आता सुरू आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन संचालिका रश्मी शुक्ला यांनी हा अहवाल तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यामार्फत सरकारला सादर केला होता. या अहवालानुसार सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर या अहवालाचा आणि बदल्यांचा काही संबंध नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्त व मंत्री नवाब मलिक यांनी केला. तसेच रश्मी शुक्ला यांचा उल्लेख त्यांनी भाजपच्या एजंट म्हणून केला आहे.

या अहवालावरून अशी राजकीय साठमारी सुरू असली तरी त्यातील काही बाबी या चर्चेच्या ठरू शकतात. कोणत्या व्यक्ती या कोणत्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या याचा सविस्तर उल्लेख यात करण्यात आला आहे. यात उमेश पाटील या व्यक्तीच्या संपर्कात सोलापूर जिल्ह्यातील तेव्हाचा वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पुण्यातील एक पोलिस उपायुक्त असल्याचे म्हटले आहे. त्यातील सोलापूर जिल्ह्यातील या अधिकाऱ्याला पुणे जिल्ह्यातील मोठे पद हवे होते. आता हा अधिकारी नगर जिल्ह्यातील मोठ्या पदावर आहे. पुण्यातील तेव्हाचे उपायुक्त आता मुंबईत नियुक्तीला आहेत.  यातील उमेश पाटील हे गृहमंत्र्यांचे ओएसडी संजीव पलांडे यांच्याशी नियमित संपर्कात असल्याचेही शेवटी लिहिले आहे.

नांदेड जिल्ह्यातील तीन वरिष्ठ अधिकारी हे उमेश राठोड या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील एक आयपीएस आणि दोन राज्य सेवेतील आहेत. विशाल कदम नावाच्या व्यक्तीही बदलीची कामे करून देत असल्याचे अनेकांना सांगत होता. त्यानेही राज्य सेवेतील तीन अधिकाऱ्यांच्या बदलीची कामे घेतली होती. नाशिक येथील एका बदलीसाठी कसे प्रयत्न झाले याचा सविस्तर माहिती यात दिली आहे. नाशिकमधील हे काम संतोष जगताप नावाच्या व्यक्तीने करून दिले. जळगाव पोलिस अधीक्षकपदासाठी एका एसपीला तुमची नियुक्ती झाल्याचे नवाज मणेर नावाची व्यक्ती सांगत आहे. तसेच देवराम भोजे नावाच्या एका कर्मचाऱ्याचा यात वारंवार उल्लेख येत आहे. यात सर्वाधिक बदल्यांची कामे महादेव इंगळे नावाच्या व्यक्तीने घेतली होती. त्याने 29 आयपीएस आणि राज्य सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पोस्टिंग देण्याचे कबूल केले होते. या 29 च्या यादीतील काही जण हे उमेश राठोड आणि उमेश पाटील यांच्याही संपर्कात असल्याचे या अहवालावरून येते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख