Who has a chance in Beed for the post of Governor ...   | Sarkarnama

राज्यपाल नियुक्त आमदारपदी बीडमध्ये कोणाला संधी...

दत्ता देशमुख  
शुक्रवार, 3 जुलै 2020

जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी व रजनी पाटील दावेदार मानल्या जातात. राज्यपाल आणि पक्षश्रेष्ठींचे सुत्र कधी जुळणार आणि जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार याकडे इच्छुकांचे समर्थकांचे लक्ष लागले आहे.  

बीड : नियमांवर बोट ठेवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नियमावर बोट ठेवण्याचा पुर्वानुभव पाहता सत्ताधारी पक्षांकडूनही राज्यपाल नियुक्त जागांबाबत ‘अस्ते कदम’ची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सत्तापक्षातील दावेदारांमध्ये धाकधुक आहे. जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी व रजनी पाटील दावेदार मानल्या जातात. राज्यपाल आणि पक्षश्रेष्ठींचे सुत्र कधी जुळणार आणि जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार याकडे इच्छुकांचे समर्थकांचे लक्ष लागले आहे.  

जयदत्त क्षीरसागर हे जिल्ह्याच्या राजकारणातील बडी आसामी आहेत. उपमंत्री, राज्यमंत्री, कॅबीनेटमंत्री अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिलेली आहे. शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि कार्यकर्त्यांची फौज असे त्यांचे राजकीय जाळे भक्कम आहे. त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना उद्धव ठाकरेंनी कॅबीनेट मंत्रीपदाची संधी दिली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

सरकार महाविकास आघाडीचे असले तरी जिल्ह्यातील राजकीय रचना पाहता सध्या ते सत्तेपासून अगदीच दुर आहेत. शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी त्यांना नियुक्त जागेवर संधी द्यावी, अशी समर्थकांची अपेक्षा आहे. मात्र, चंद्रकांत खैरे व आनंदराव आडसुळ या दोन शिवसेनेतील जेष्ठ नेत्यांचा क्षीरसागरांना स्पीड ब्रेकर मानला जातो. आता श्रेष्ठी त्यांच्याबाबत काय विचार करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

राज्यपाल नियुक्त जागा या कला, क्रीडा, साहित्य अशा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांसाठीच्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी नियमावर बोट ठेवले तर काय, अशी अडचण सध्या सत्ताधारी पक्षांसमोर आहे. त्यांनी अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीही नियमाला बगल दिली नव्हती. त्यामुळे राज्यपालांच्या कसोटीत उतरणारी आणि राजकीय बॅलेन्सही जुळावे, अशी कसरत राजकीय पक्षांना करावी लागणार आहे. या दोन्हींचे सुत्र जुळल्यानंतर जिल्ह्याच्या वाट्याला काय येणार हे पहावे लागणार आहे.

राष्ट्रवादीकडून प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांना संधी मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून राजकीय कारकिर्द सुरु करणाऱ्या अमरसिंह पंडित यांनी विधीमंडळातही मराठवाड्यातील दुष्काळ, पाणी अशा अभ्यासपूर्ण विषयावरुन सरकारला धारेवर धरलेले आहे. अमरसिंह पंडित दोन्ही पवारांच्या गोटातले मानले जातात. जिल्ह्यातूनही पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे व संदीप क्षीरसागर पंडित यांना अनुकूल आहेत. परंतु, त्यांचे मामा राजन पाटील यांचा दावा त्यांच्यापेक्षा तगडा मानला जातो.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी देखील विधान परिषदेसाठी दावेदार मानले जातात. मे महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलेली उमेदवारी ऐनवेळी रद्द झाली. त्यामुळे ती कसर आता भरुन निघेल अशी अपेक्षा समर्थकांना आहे. ३५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेले राजकीशोर मोदी यांनी २५ वर्षे अंबाजोगाई पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवित ठेवलेला आहे. सहकार, शिक्षण क्षेत्रातही त्यांचे काम असून यापूर्वीही त्यांनी संघटना व महामंडळावर पदे भूषविलेली आहेत. मोदी हे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख यांच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. परंतु, राज्यसभेवर राजीव सातव आणि विधान परिषदेवर जालन्याचे राठोड या दोघांना मराठवड्यातून नुकतीच भेटलेली संधी पाहता पक्ष पुन्हा मराठवाड्याच्या झोळीत काही टाकेल का, असा प्रश्न आहे.

रजनी पाटील देखील विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून दावेदार मानल्या जातात. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्या अगदीच निकटच्या असलेल्या श्रीमती पाटील या केंद्रीय काँग्रेस समितीच्या कायम निमंत्रीत सदस्याही आहेत. यापूर्वी त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अशा विविध पदांवर काम केलेले आहेत. सध्या त्या हिमाचल प्रदेश कॉंग्रेसच्या प्रभारीही आहेत. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मंत्री अशोक चव्हाण या दोन्ही गटांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र, मराठवाड्याला किती हा निकष त्यांनाही आडवा येऊ शकतो. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख