धरणे आंदोलनास बसलेल्या खासदारांसाठी राज्यसभेचे उपाध्यक्ष जेव्हा चहा घेऊन येतात...!  - When the Rajya Sabha Vice President brings tea for the MPs who are on fast ...! | Politics Marathi News - Sarkarnama

धरणे आंदोलनास बसलेल्या खासदारांसाठी राज्यसभेचे उपाध्यक्ष जेव्हा चहा घेऊन येतात...! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

राज्यसभेत जेव्हा कृषि विधेयक चर्चेला आले तेव्हा अभुतपूर्व गोंधळ झाला.

नवी दिल्ली : राज्यसभेत निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी दिल्लीतील गांधी पुतळ्याजवळ कालपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन करणाऱ्या या सदस्यांसाठी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश आज सकाळी चहा घेऊन आले होते. 

गेल्या दोन दिवसापासून राज्यसभेत कृषि विधेयकांवर प्रचंड गोंधळ सुरू आहे. मोदी सरकारने हे विधेयक संमत करताना संसदीय परंपरचे पालन केले नाही. आवाजी मतदान घेऊन विरोधकांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप कॉंग्रेस, आप, तृणमूल कॉंग्रेससह काही पक्षांनी केला आहे. 

राज्यसभेत जेव्हा कृषि विधेयक चर्चेला आले तेव्हा अभुतपूर्व गोंधळ झाला. या गोंधळात तृणमूलचे सदस्य प्रचंड आक्रमक झालेले दिसून येत होते. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे ही सरकारचा निषेध करण्यासाठी आघाडीवर होते. आपचे संजयसिंह यांनीही सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचा जुना मित्र शिरोमणी अकाली दलही या विधेयकांवरून नाराज आहे. हा पक्ष सत्तेतून बाहेर पडला आहे. अकाली दलाच्या खासदारांनी काल राष्ट्रपतींची भेट घेऊन या विधेयकावर सही करू नये आवाहन केले आहे. 

दरम्यान, केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनीही माध्यमांशी बोलताना आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आहे. कॉंग्रेसने या विधेयकाला विरोध करण्याऐवजी त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात काय म्हटले होते ते पाहावे. पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीच उठवून बसविले असून या दोन राज्यात जी आंदोलने झाली त्यामध्ये शेतकऱ्यांऐवजी पक्षाचे कार्यकर्तेच अधिक होते असा आरोपही केला आहे. हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहे कुठेही उद्योजकंचे हित पाहिले नाही. विरोधक आमच्यावर चुकीची टीका करीत आहे. बाजार समिती या प्रत्येक राज्याचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी गोंधळी आठ सदस्यांना एक आठवड्यासाठी निलंबित केले आहे. त्यांनी तृणमूलचे सदस्य डेरेक यांनातर सभागृहाबाहेर जाण्याचा आदेशही दिला होता. ज्या आठ सदस्यांचे निलंबन केले आहे ते परत घ्या या मागणीसाठी हे आठहीजण संसदभवनातील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यास बसले आहेत. त्यांची काळजी मात्र राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी घेतली आहे. ते स्वत: त्यांच्यासाठी चहा घेऊन आले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख