कॉंग्रेस सत्तेवर येईल तेव्हा कृषी विधेयके कचरा टोपलीत टाकू, राहुलबाबांची शेतकऱ्यांना गॅरेंटी  - When the Congress comes to power, we will throw the agriculture bills in the trash, Rahul Baba's guarantee to the farmers | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेस सत्तेवर येईल तेव्हा कृषी विधेयके कचरा टोपलीत टाकू, राहुलबाबांची शेतकऱ्यांना गॅरेंटी 

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

मोदी सरकारने आणलेल्या या विधेयकावर जर शेतकरी खूष आहेत तर मग देशभरात या विधेयकांना का विरोध होत आहे. शेतकरी का निषेध करीत आहेत.

मोगा (पंजाब) : "" मी तुम्हाला गॅरेंटी देतो की, ज्या दिवशी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल त्यादिवशी मोदी सरकारने आणलेली तीन्ही कृषी विधेयक रद्द करून ती कचरा कागदाच्या टोपलीत टाकू ,'' अशी गर्जना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज येथे केली. 

मोदी सरकारने आणलेल्या या विधेयकावर जर शेतकरी खूष आहेत तर मग देशभरात या विधेयकांना का विरोध होत आहे. शेतकरी का निषेध करीत आहेत. पंजाबमधील प्रत्येक घराघरातील शेतकरी या विधेयकाला का विरोध करीत आहे याचं उत्तरही केंद्राने द्यायला हवे. 

यूपीत एका निरपराध युवतीची हत्या होते. ज्यांनी तिला मारले त्यांच्यांविरोधात कारवाई होत नाही. उलट त्या अभागी पीडितेच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना घरात कोंडून ठेवले जाते. असा घटना येथे होतात. गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी ज्यांचा काही दोष नाही अशांवर कारवाई केली जात आहे हे धक्कादायक आहे असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे. 

यूपीतील हाथरसप्रकरणाने देश हादरला. एका निष्पाप युवतीचा काही दोष नसताना तिची हत्या केली. ज्या नराधमांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला ती पीडित युवती काही दिवस मृत्यूशी झूंज देत होती. शेवटी तिने उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. या पीडितेचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात होता. तिचा मृतदेड गावात आणण्यात आणल्यानंतर तिच्या आईवडिलांना आपल्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही यावरून संतापात अधिकच भर पडली. 

यूपी पोलिसांच्या दादागिरीचा सर्वत्र निषेध होऊ लागला. या घटनेनंतर राहुल आणि प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना झाले मात्र त्यांनाही अडविण्यात आले. राहुल यांना तर धक्काबुक्की करण्यापर्यंत यूपी पोलिसांची मजल गेली. शेवटी राहुल आणि प्रियंका पीडितेच्या गावात गेले त्यांना भेटून आले. 

या सर्व घडामोडीची दखल राहुल गांधी यांनी आज पंजाबमधील शेतकरी आंदोलनात घेत केंद्रातील मोदी सरकार आणि यूपीतील योगी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने आणलेल्या कृषि विधेयकाचा निषेधार्थ कॉंग्रेसने आज मोगा येथे " खेती बचाओ यात्रा' आयोजित केली आहे. या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, खासदार नवज्योतसिंग सिद्धू आदी नेते यावेळी उपस्थित होते. 

खेती बचाओ यात्रेत आज पंजाबमधील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकरी कृषि विधेयकाविरोधात जोरदार घोषणा देत होते. राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना विश्वास देताना सांगितले, की ज्या दिवशी कॉंग्रेस केंद्रात सत्तेवर येईल तेव्हा ही तीन्ही विधेयके रद्द करण्यात येतील आणि कचरा कागदाच्या टोपलीत टाकू असे आश्‍वासन मी आज तुम्हाला देत आहे. 

या तीन्ही विधेयकावरून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशातील शेतकरीही नाराज आहेत. काही दिवसापूर्वी देशभर या विधेयकाविरोधात आंदोलनही करण्यात आले होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमररिंदरसिंग यांनी या विधेयकावर कडाडून टीका केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख