प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरासाठी आंदोलन केलं तर काय चुकलं? - What is wrong if Prakash Ambedkar agitated for Vitthal temple? | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरासाठी आंदोलन केलं तर काय चुकलं?

योगेश कुटे
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

प्रकाश आंबेडकरांनी राजकारणात नेहमीच वेगळे प्रयोग केले.

पुणे : ज्येष्ठ लेखक डाॅ. रा. चिं. ढेेरे यांचे `श्री विठ्ठल : एक महासमन्वय` हे विठ्ठलाचा शोध घेणारे एक पुस्तक आहे. शैव आणि वैष्णव या दोन परंपरांचा कसा समन्वय या विठ्ठलात झाला आहे, हे त्यांनी सांगितले आहे. तसाच हा विठ्ठल आता राजकारण्यांसाठीही समन्वय साधू पाहतो आहे. त्याची प्रचिती प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी सोमवारी (ता. 31 आॅगस्ट) केलेल्या आंदोलनातून दिसून आली. 

कोरोनाच्या संकटानंतर जग बदलेले, असे सारेच बोलत होते. पण राजकारणीही असे 360 अंशांनी लगेच बदलतील, हे अपेक्षित नव्हते. पण तसे कोरोनाकाळात बंद असलेल्या मंदिरांनी घडवून आणले. मंदिरांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेला आधार दिला. तसा आधार आता इतर पक्षही शोधू लागले आहेत.  

प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे खासदार इम्तिआज जलिल ही मंडळी मंदिर उघडण्यासाठी आग्रही झाल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आपल्या धर्माचे, पंथाचे आणि जातीचे राजकारण करण्याच्या सध्याच्या दिवसांत या दोन नेत्यांची भूमिका वेगळी होती.  बौद्ध, नवबौद्ध, हिंदू समाजातील अनुसूचित जातींना सोबत घेण्याचे आंबेडकरांचे आधीचे राजकारण होते. जहाल हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात दलित राजकारण उभे राहिले. कोणत्याही धर्मापेक्षा संविधान महत्त्वाचे मानणारी विचारधारा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाने सुरवातीला घेतली होती. मात्र आंबेडकरांच्या निधनानंतर ही विचारधारा लुप्त झाली. रिपब्लिकन पक्षाची शकले झाली आणि नेतेपण आपल्या जातीपुरते झाले. 

हा धोका सर्वप्रथम प्रकाश आंबेडकरांनी ओळखला. दलित राजकारणाला असलेल्या सीमा ओलांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सुरवातीला हा प्रयोग भारीप बहुजन महासंघ म्हणून त्यांनी अकोल्यात चालवला. त्याला चांगले यश आले. त्याचा पुढचा टप्पा त्यांना वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला. सर्व ओबीसींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यात नंतर एमआयएमला सोबत घेऊन हा परिघ आणखी विस्तारण्यासाठी पावले टाकली. पण प्रकाश आंबेडकरांच्या या प्रयोगांचे आकर्षण येथील उच्च जातींना वाटले नाही. त्यामुळेच एक-दोन जिल्हे वगळता त्यांच्या प्रयोगांना यश आले नाही. यात आंबेडकरांच्या वैयक्तिक स्वभावाचा जसा गुणदोष आहे. तसाच येथील समाजव्यवस्थेचाही आहे.

आंबेडकरांनी आता पुढे पाऊल टाकून आपण हिंदूविरोधी नसल्याचा संदेश पंढरपुरातून दिला आहे. या भूमिकेचे धोकेही आहेत. कारण त्यातून त्यांना परंपरागत मानणारी मतपेढी त्यांच्यापासून दुरावू शकते. ही मतपेढी जहाल हिंदुत्वाला विरोध करणारी आहे. हिंदुत्वाची मिथके नाकारणारी आहे. आंबेडकरांना मुख्य धारेतील नेता व्हायचा असेल तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या बहुसंख्यांकवादाचे दिवस आहेत. जशा अल्पसंख्यांकांच्या भावना आहेत, तशा आमच्याही आहेत, असा हा वर्ग भूमिका मांडतो आहे. प्रकाश आंबेडकरांनी यापुढे आता अनुसूचित जाती-जमातींना राजकीय आरक्षण नको, असे मत व्यक्त करून खळबळ उडवली होती. त्यातून त्यांना आपण केवळ विशिष्ट समाजापुरता नेता व्हायचे नाही, ही त्यांनी आधीपासूनच भूमिका घेतली आहे. ही रेघ पुढे नेण्यासाठी विठ्ठलासारखे दुसरे दैवत नाही. म्हणूनच आंबेडकारांनी एक पाऊल त्यादृष्टीने पुढे टाकले आहे. बहुजनांचे दैवत असलेल्या विठ्ठलाशिवाय दुसरा कोणता पर्याय योग्य होता?

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख