"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम म्हणजे काय ? - What is the My Family My Responsibility campaign | Politics Marathi News - Sarkarnama

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम म्हणजे काय ?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे स्वयंसेवक आता प्रत्येक घरात पोहचून नागरिकांच्या शरीराचे उष्मांक आणि प्राणवायूची पातळी तपासणार आहेत.

मुंबई : "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत प्रत्येकानं सामील व्हावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे स्वयंसेवक आता प्रत्येक घरात पोहचून नागरिकांच्या शरीराचे उष्मांक आणि प्राणवायूची पातळी तपासणार आहेत. त्याचबरोबर मास्क, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण यापुढे जाऊन वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदल करण्याबाबतही स्वयंसेवक मार्गदर्शन करणार आहेत. 

कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे, हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. यात बोलण्याची पद्धत, लिफ्ट वापरण्याची पद्धत, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याची पद्धत, जेवण पद्धत, शौचालयांचा वापर आणि प्रवासाच्या पद्धतीतही बदल करायचा आहे. कोव्हिडचे संशयित रुग्ण शोधणे यासोबतच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड (किडनी) विकार, लठ्ठपणा यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारांना प्राधान्य देणे, याबाबींचादेखील मोहीमेत समावेश आहे. मोहिमेच्या कालावधीत दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत.

स्वत:साठी

 1. - रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावे.
 2. - मास्क काढून ठेवू नये. नाकाखाली/चेहऱ्याखाली मास्क न ठेवता योग्य ठेवावा.
 3. - चेहऱ्याला तसेच मास्कला वारंवार हात लावू नये.
 4. - एकदाच वापरात येणारे मास्क (सिंगल यूज मास्क) टाकून देण्यापूर्वी त्यावर सॅनिटायझर शिंपडून, त्यांचे तुकडे करावे.
 5. - स्वच्छ हातरुमाल बाळगावा. सर्दी, खोकला असल्यास स्वच्छ मास्क, रुमाल यांचा सातत्याने उपयोग करावा.
 6. - पुनर्वापराचे मास्क सॅनिटायझरचा उपयोग करून दररोज स्वच्छ धुवावेत.
 7. - कुटुंबातील प्रत्येकाने स्वतंत्र मास्क वापरावे.
 8. - कोणाशीही बोलत असताना एकमेकांच्या चेहऱ्याकडे थेटपणे न बघणे.
 9. - कोणतेही वाहन चालवताना, वाहनांतून प्रवास करतानाही मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे.
 10. - बंदिस्त वातावरण टाळावे. याचप्रमाणे गर्दीत जाणे किंवा निकटचा संपर्कही टाळावा.
 11. - अरुंद ठिकाणी जास्त वेळ थांबू नये.
 12. -कोव्हिडची लक्षणे असल्यास आपण कुठे-कुठे गेलो होतो आणि कोणा-कोणाला भेटलो, ते आठवावे. शक्‍यतो भेटीच्या नोंदी ठेवाव्यात.
   

कुटुंबासाठी

 1. - कुटुंबात वावरताना, कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे, सूचनांचे अनावधानाने कोणाकडून उल्लंघन होत असल्यास ते एकमेकांच्या लक्षात आणून द्यावे.
 2. - घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष पुरवावे.
 3. - घरातील ज्या सदस्यांना दीर्घकालीन आजार असतील, ते नियमितपणे औषधोपचार घेतात का, तसेच त्यांची प्रतिकारशक्‍ती टिकून राहण्याबाबत काळजी घ्यावी.
 4. - कुटुंबात एकत्र जेवायला बसताना समोरासमोर न बसता एका बाजूला एक याप्रमाणे बसावे.
 5. - शक्‍यतो घरातील एकाच सदस्याने कौटुंबिक कामांसाठी बाहेर ये-जा करावी. त्या सदस्याने अशी ये-जा करताना संपूर्ण दक्षता घ्यावी.
 6. - घरातील प्रत्येक सदस्याने दररोज स्वच्छ कपडे परिधान करावेत, न धुता कपड्यांचा पुन्हा वापर करू नये.
 7. - भ्रमणध्वनीसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांकडे घेऊन किंवा अदलाबदली करून वापरू नयेत.
 8. - घरातील फरशी, स्वयंपाकगृह, प्रसाधनगृहे, इतर वापराच्या वस्तू यांची नियमितपणे स्वच्छता करावी.
 9. - नातेवाईक, मित्र आदींकडे जाणे टाळावे.

आहार आणि व्यायाम

 1. - जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्‍त पदार्थ असावेत.
 2. - पुरेसा व योग्य वेळ आहार, पुरेशी झोप, व्यायाम/योग/प्राणायाम आदीद्वारे प्रतिकारशक्‍ती वाढवावी.
 3. - एकाच भांड्यात किंवा पातेल्यात पदार्थ घेण्याऐवजी ते आवश्‍यकतेनुसार एकदाच ताटात घ्यावेत.
 4. - जेवताना मौन ठेवावे किंवा कमीत कमी बोलावे.
 5. - चालण्यास किंवा धावण्यास गेल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी व्यक्ती व सुरक्षित अंतरावर असतील, असे पाहावे.
 6. - सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी.
 7. - दरवेळी बाहेरून/कार्यालयातून घरी परतल्यावर सर्वप्रथम आंघोळ करावी. कपडे धुण्यासाठी थेट एका बादलीमध्ये टाकावेत.
 8. - कोव्हिड विषाणूचा अधिक प्रादुर्भाव असणाऱ्या परिसरांना/शहरांना/राज्यांना/ देशांना भेट देणे टाळावे.
 9. - खाद्यपदार्थांचे पार्सल मागवले असल्यास ते स्वयंपाकगृहात खूप वेळ राखून ठेवू नये. पदार्थ काढून झाल्यानंतर आवरण, डबे आदींची तातडीने विल्हेवाट लावावी.
 10. - बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे आदी स्वच्छ धुऊन ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात समावेश करावा.

 प्रवासादरम्यान

 1. - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असताना मौन राखावे. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये.
 2. - मास्कसमवेत फेसशिल्डचाही उपयोग केल्यास उत्तम.
 3. - सार्वजनिक वाहनात एका आसनावर एकाच व्यक्‍तीने बसावे.
 4. - वाहनांमध्ये गर्दी करून, दाटीवाटीने प्रवास करू नये. असा प्रवास टाळणे उत्तम.
 5. - वाहनांमध्ये दरवाजा, कठडा यांना शक्‍यतो स्पर्श करू नये. स्पर्श करावा लागणार असल्यास त्या आधी व वाहनातून उतरल्यानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे.
 6. - शक्‍यतो खासगी दुचाकी/चारचाकी वाहनाचा उपयोग प्रवासाच्या गरजेनुसार करावा. खासगी वाहनांमध्ये विनाकारण सहप्रवासी नेऊ नयेत.
 7.  Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख