विजय वडेट्टीवारांच्या मनात चाललंय काय?  - What is going on in Vijay Vadettiwar's mind | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

विजय वडेट्टीवारांच्या मनात चाललंय काय? 

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 16 जुलै 2021

नागपुरातील आंदोलन, राज्यपालांची भेट आणि टिळक भवनातील बैठकांत वड्डेटीवार दिसले नाहीत.

मुंबई : कॉंग्रेसमुळे राजकीय क्षेत्रात रोज नव्या वादांना तोंड फुटत असताना कॉंग्रेस (Congress) नेत्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत का, हा प्रश्‍न ज्येष्ठ नेते, ‘ओबीसी’ मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या फटकून वागण्याने विचारला जात आहे. पक्षाच्या बैठका, भेटीगाठी, आंदोलनापासून वडेट्टीवार लांब राहात असल्याने त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचीही चर्चा कॉंग्रेस वर्तुळात रंगू लागली आहे. (What is going on in Vijay Vadettiwar's mind)   

नागपुरातील आंदोलन, राज्यपालांची भेट आणि टिळक भवनातील बैठकांत वड्डेटीवार दिसले नाहीत. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या बैठकीला ते उशिराने आल्याकडेही बोट दाखविले जात आहे. वडेट्टीवार यांच्याबाबतची माहिती घेतो, इतकेच मोजके उत्तर देऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर बोलणे टाळले. कॉंग्रेसमध्ये वडेट्टीवार हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात पटोले हे प्रदेशाध्यक्षपदावर येऊन त्यांची ताकद वाढल्यानेही वडेट्टीवार नाराजीत भरच पडली, असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील!

आपण ओबीसी असल्यानेच महसूल मंत्रिपद मिळाले नसल्याची खंतही वडेट्टीवार यांनी जाहीरपणे बोलून दाखवून त्यांनी पक्षांतर्गंत गटातटाचा मुद्दा पुढे आणला होता. त्यावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी त्यांना सबुरीचा सल्लाही दिला. त्यानंतर वडेट्टीवार हे पक्षाच्या नेत्यांत फारसे मिसळत नसल्याचेही वारंवार दिसत आहे. महगाईच्या मुद्दयावरून पटोले यांनी नागपुरात काढलेल्या मोर्चातही वडेट्टीवार कुठे दिसले नाहीत. 

त्यानंतर राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, एच. के. पाटील यांच्या उपस्थितीतील बैठकीलाही ते सोयीनेच आले. त्यानंतरची पत्रकार परिषद आणि अन्य गाठीभेटीतही ते कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. पटोले यांच्या विधानांमुळे टिळक भवनात रोजच पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ दिसते आहे. त्याच गडबडीत पक्षप्रवेश, बैठकाही उकरल्या जात आहेत. म्हणून काही मंत्री, नेते, आमदार टिळक भवनात हमखास येतात. या गर्दीत शोधूनही वडेट्टीवार सापडत नाहीत. 

हेही वाचा : आघाडी सरकारच्या विरोधात आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

पटोलेंच्या नव्या भूमिकांमुळे महाविकास आघाडी आणि राजकीय वर्तुळात उलथापालथाचा अंदाज पुढे येत असतानाच कॉंग्रेस नेत्यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. तेव्हाही बहुतांशी मंत्री, नेते होतेच पण वडेट्टीवार दिसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. वडेट्टीवार हे गायब असल्याने ते सध्या कुठे असतात? याची उत्सुकता कॉंग्रेस नेत्यांत आहे. दुसरीकडे, मंत्रालयातही ते फारवेळ थांबत नसल्याचे दिसते. ‘साहेब आहेत का, यावर त्यांच्या दालनातून ते बंगल्यावर असल्याचे उत्तर दिले जाते. त्यामुळे वडेट्टीवार नेमके कुठे भेटतील, याची विचारणा त्यांच्याकडे येणारे गेस्ट करीत असतात. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख