शरद पवारांनी उदयनराजे, संभाजीराजेंना काय सल्ला दिला?  - What advice did Sharad Pawar give to Udayan Raje and Sambhaji Raje? | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी उदयनराजे, संभाजीराजेंना काय सल्ला दिला? 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्‍नात लक्ष घातले बरे झाले.

पंढरपूर : "भारतीय जनता पक्षाच्या मदतीने राज्यसभा सदस्य बनलेले छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. कारण, त्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्ष आहे ' असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये दिला. 

पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पवार आज (ता. 29 सप्टेंबर) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्‍नांवर मत व्यक्त केले. 

संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्‍नात लक्ष घातले बरे झाले, असे सांगून शरद पवार म्हणाले की भारतीय जनता पक्षाने उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर निवड केली, तर संभाजीराजेंची निवड राष्ट्रपतींनी केली. पंतप्रधानांकडून शिफारस करण्यात आल्यानंतर राष्ट्रपती संबंधितांची राज्यसभेवर निवड करतात. पंतप्रधान कोण तर नरेंद्र मोदी, त्यामुळे ज्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आहे. त्यांच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवून घेण्यासाठी मदत होईल; म्हणून या दोन्ही छत्रपतींनी आरक्षण प्रश्‍नी पुढाकार घ्यावा, असे पवार यांनी सांगितले. 

सुशांतसिंह प्रकरणावरून भाजपला टोला 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर केंद्र सरकारचा विश्‍वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, सीबीआय) नेमली. त्या एजन्सीने आत्तापर्यंत काय दिवे लावलेत? ते आम्हाला काय दिसत नाहीत. त्याचा प्रकाश आम्हाला बघायला मिळत नाही. त्यामुळे आता हे प्रकरण भलतीकडेच चालले आहे. सत्य कधी बाहेर येईल, त्या वेळीच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे उत्तर देत या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या राज्यातील भाजपच्या नेत्यांना शरद पवार यांनी टोला लगावला. 

आठवलेंना कोणीही गांभीर्याने घेत नाही ! 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार, खासदार जनतेतून निवडून आलेला नाही. ते कायम बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात, त्यांची सभागृहात आणि बाहेरही कोणी गांभीर्याने दखल घेत नाहीत, अशा शब्दांत शरद पवार यांनी आठवले यांच्या "एनडीए'त येण्याच्या आवाहनाची खिल्ली उडवली. शरद पवार यांनी एनडीएमध्ये सामील व्हावे, असे आवाहन आठवले यांनी नुकतेच केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख