'बंगाल की बेटी'च्या मृत्यूवरून पेटलं राजकारण; भाजपच्या झेंड्यात लपेटला मृतदेह  - West Bengal election Politics over the demise of Shova Majumdar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

'बंगाल की बेटी'च्या मृत्यूवरून पेटलं राजकारण; भाजपच्या झेंड्यात लपेटला मृतदेह 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मार्च 2021

गृहमंत्री अमित शहा यांनी महिलेच्या मृतदेहाचा फोटो ट्विट करून दु:ख व्यक्त केलं आहे. 

नवी दिल्ली : देशात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराला आता वेगळं वळण लागलं आहे. एका ज्येष्ठ महिलेच्या मृत्यूवरून बंगालचे राजकारण पेटलं आहे. त्यात खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनीही उडी घेतली आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानेच या महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा भाजपने केला आहे. या महिलेला 'बंगाल की बेटी' म्हणत भाजपने काही दिवसांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

बंगालच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील निमटा येथील भाजप कार्यकर्ता गोपाल मजूमदार आणि त्यांची 85 वर्षांची आई शोवा यांना मारहाण झाली होती. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर बंगालमध्ये जोरदार पोस्टर वॉर रंगले होते. 

हेही वाचा : भाजप आमदार माझी हत्या करेल; सेक्स स्कँडलमधील तरूणीची उच्च न्यायालयात धाव

ममता बॅनर्जी यांनी सुरूवातीपासूनच आपली प्रतिमा ''बंगाल की बेटी" अशी निर्माण करत भाजपला बाहेरील संबोधले आहे. महिलेवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या छायाचित्रासह "बंगाल की बेटी असुरक्षित'' असे विविधप्रकारचे पोस्टर बंगालमध्ये भाजपकडून लावण्यात आले. त्यामुळे बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच आता या महिलेचा मृत्यू झाल्याने ऐन रणधुमाळीत बंगालमध्ये भाजपकडून तृणमूलला घेरण्यास सुरूवात झाली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून महिलेच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, बंगालची मुलगी शोवा मजूमदारच्या निधनाने मन व्यथित झाले आहे. टीएमसीच्या गुंडांनी त्यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. शोवा मजूमदार यांंच्या परिवाराचे दु:ख ममतादीदी यांना स्वस्थ बसू देणार नाही. बंगाल हिंसामुक्तीसाठी लढेल. महिलांना सुरक्षित राज्याची लढाई बंगाल लढेल,'' असे शहा यांनी म्हटले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत. शोवा मजूमदार यांचा मुलगा भाजपचा कार्यकर्ता असल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्याही बंगालची मुलगी होती. भाजप नेहमी महिलांच्या सुरक्षेसाठी लढत राहील, असे नड्डा म्हणाले आहेत. या दोघांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी तृणमूलवर टीका सुरू केली आहे. 

मृतदेह भाजपच्या झेंड्यात लपेटला

शोवा मुजूमदार यांचा मृतदेह भाजपच्या झेंड्यामध्ये लपेटण्यात आला होता. अमित शहा यांनीच हा फोटो ट्विट केला आहे. बंगाल भाजपच्या काही महिला कार्यकर्ताही याठिकाणी दिसत आहेत. शोवा मजूमदार यांचा मुलगा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या मुद्दयावरून भाजने रान उठविण्यास सुरूवात केली आहे. सोशल मिडियावर शोवा मजूमदार यांचा फोटो व्हायरल होत असून ममतांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख