खासदाराला विधानसभेचे तिकीट देऊन फसली भाजप - West bengal election BJP MP swapan dasgupta in trouble after getting ticket | Politics Marathi News - Sarkarnama

खासदाराला विधानसभेचे तिकीट देऊन फसली भाजप

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये भाजपने एक केंद्रीय मंत्री व तीन खासदारांना विधानसभेचे तिकीट दिले आहे.

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये भाजपने एक केंद्रीय मंत्री व तीन खासदारांना विधानसभेचे तिकीट दिले आहे. त्यावरून तृणमूल काँग्रेसने भाजपला उमेदवारच मिळत नसल्याची टीका केली आहे. तसेच भाजपने उमेदवारी दिलेल्या राज्यसभा खासदारांवरूनही भाजप अडचणी आली आहे. तृणमूलने त्यांची खासदारकी रद्द करण्यासाठी राज्यसभेत आवाज उठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

भाजपचे राष्ट्रीय सचिव अरूण सिंह यांनी नुकतीच बंगालमधील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील अनुक्रमे २७ व ३६ उमेदवारांची यादी प्रसिध्द केली. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांना टॉलीगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच खासदार लॉकेट चॅटर्जी, स्वपन दासगुप्ता आणि निशित प्रमाणिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. बाबूल सुप्रियो हे पर्यावरण राज्यमंत्री आहे. 

खासदार स्वपन दासगुप्ता यांना भाजपने हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला तृणमूलने विरोध केला आहे. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. दासगुप्ता यांना भाजपने अधिकृतपणे उमेदवारी घोषित केली आहे.

भारतीय संविधानातील १० व्या अनुसूचीनुसार राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदारांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतर कोणत्याही राजकीय पक्षात गेल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. दासगुप्ता यांनी एप्रिल २०१६ मध्ये शपथ घेतली आहे. ते अजूनही राज्यसभेचे सदस्य आहेत. आता त्यांना भाजपमध्ये सामिल होण्याबाबत किंवा खासदारकी बाबत अयोग्य घोषित करायला हवे, असे मोईत्रा यांनी म्हटले आहे. मोईत्रा यांनी संविधानातील १० वी अनुसूचीही ट्विटरवर पोस्ट केली आहे.

हेही वाचा : जर्मनी, इटली, स्पेन अन् फ्रान्सने कोरोना लशीचा वापर थांबवला

दासगुप्ता यांच्या उमेदवारीवरून भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. तृणमूलकडून हा मुद्दा आज राज्यसभेत उपस्थित केला जाऊ शकतो. दासगुप्ता यांनी अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही. दासगुप्ता यांना मोदी सरकारने २०१६ मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून नामनिर्देशित केले होते. सुब्रमण्यम स्वामी, राकेश सिन्हा आणि सोनल मानसिंह यांनी राज्यसभेचे नामांकन झाल्यानंतर लगेच राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपण भाजपशी संबंधित असल्याचे सांगितले होते. 

राज्यसभा अध्यक्ष निर्णय घेणार

तृणमूलने दासगुप्ता यांच्या राज्यसभा सदस्यत्वबाबत तक्रार केल्यास राज्यसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यावा लागेल. पण संविधानानुसार दासगुप्ता यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. यापूर्वी अशाप्रकारे कधीही राज्यसभेतील नामनिर्देशित खासदारांनी शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर राजकीय पक्षात प्रवेश केल्याचे किंवा निवडणूक लढविली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दासगुप्ता यांना एकतर भाजपची उमेदवारी नाकारावी लागेल किंवा राज्यसभेची खासदारकी सोडावी लागणार आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख