निवडणूक बेतली जीवावर; कोरोनाने घेतला चार उमेदवारांचा बळी - In west Bengal Corona took the lives of four candidates | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणूक बेतली जीवावर; कोरोनाने घेतला चार उमेदवारांचा बळी

वृत्तसंस्था
रविवार, 25 एप्रिल 2021

देशात कोरोना रुग्णांना दैनंदिन आकडा जवळपास साडे तीन लाखांपर्यंत पोहचला आहे.

कोलकाता : देशामध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना पश्चिम बंगालमध्ये अजूनही विधानसभा निवडणुका सुरू आहेत. बहुतक राजकीय पक्षांनी आता मोठ्या प्रचारसभा न घेण्याचे जाहीर केले असले तरी आतापर्यंत या निवडणुकीने चार उमेदवारांचा बळी घेतला आहे. प्रचारादरम्यान झालेल्या कोरोना संसर्गामुळे चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात कोरोना रुग्णांना दैनंदिन आकडा जवळपास साडे तीन लाखांपर्यंत पोहचला आहे. बंगालमधील रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मागील आठवड्यापर्यंत बंगालमध्ये मोठ्या प्रचारसभा, रोड शो घेतले जात होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याही सभांचा समावेश आहे.

राहुल गांधी यांनी दोन सभा घेतल्यानंतर लगेचच यापुढे बंगालमध्ये एकही सभा घेणार नसल्याची जाहीर केले. सुरूवातीला भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. पण बंगालसह देशातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन भाजपनेही मोठ्या प्रचारसभा घेणार नसल्याचे जाहीर केले. तृणमूल काँग्रेसनेही हीच भूमिका घेतली. तसेच निवडणूक आयोगाकडूनही कडक नियम करण्यात आले. पण तोपर्यंत बंगालमध्ये चार उमेदवारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तृणमूल काँग्रेसचे खरदह विधानसभा मतदारसंघातील उमेदवार काजल सिन्हा यांचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. काँग्रेसचे शमशेरगंज मतदारसंघातील उमेदवार रेजाऊल हक यांचा 15 एप्रिलला मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याच दिवशी जंगीपुरा मतदारसंघातील रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पक्षाचे प्रदीप कुमार नंदी यांचा कोरोनाने जीव घेतला. ता. 17 एप्रिल रोजी तृणमूलचे मुरारई मतदारसंघातील उमेदवार अब्दुर रहमान यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बंगालमध्ये आतापर्यंत 7 लाख 28 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यापैकी 10 हजार 884 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालमध्ये सहा टप्प्यांतील मतदान झाले असून आणखी दोन टप्पे उरले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. यामध्ये पाच जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एकुण 268 उमेदवार असून त्यात 37 महिला आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख