तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी : संजय राऊतांना चंद्रकांतदादांचे उत्तर - we will see let you not sleep well challenges Chandrkant Pati | Politics Marathi News - Sarkarnama

तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी : संजय राऊतांना चंद्रकांतदादांचे उत्तर

अमोल कविटकर
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर 

पुणे : कशाचा कशाला मेळ नाही. झेंडा वेगळा, विचार वेगळा असे असतानाही सेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची भाषा करत आहेत. हिंम्मत असेल तर वेगळे लढा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याचे सूतोवाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टिकेलाही त्यांनी उत्तर दिले. 

पाटील म्हणाले की  संजय राऊत यांना भाजपवर टीका करण्याची ड्युटी दिलेली आहे. ते त्यांचं उत्तम काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या टिकेचा फारसा विचार करण्याची गरज नाही. या तीनही पक्षात हिंम्मत नसल्याने त्यांना एकत्र निवडणूक लढवावी लागत आहे. आमची सगळ्याला तयारी आहे.  वेगवेगळे लढले तर भाजप हाच सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष ठरेल. हिम्मत असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे लढावे. सरकार पाच वर्षे चालण्याला आमचा आक्षेप नाही. पण प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे, असे आव्हान त्यांनी केले.

शिवसेना आणि भाजपचे हिंदुत्व हे वेगळे असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यालाही पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की होय, त्यांचे आणि आमचे हिंदुत्व वेगळे आहे. सावरकरांना समलिंगी आणि संभोगी म्हणणाऱ्या काँग्रेसने काही म्हटलेच नाही, असे कानात बोळे घालून बसणं हेच शिवसेनेचे हिंदुत्व. राम मंदिराचे ई भूमिपूजन करा, हे सांगणे हेही शिवसेनेचे हिंदुत्व आहे. एखाद्या धर्माचे लांगुलचालन आणि हिंदू धर्माला तुच्छ लेखणे हे आमचे हिंदुत्व नाही.``

राज्यपालांकडे जाणे म्हणजे अपमान समजणाऱ्या राऊतांना राज्यघटना समजते की नाही, असा सवाल विचारून राज्यपाल हेच मुख्यमंत्र्यांना शपथ देतात. त्यामुळे ते घटनात्मक प्मुख आहेत. त्यांच्याकडे दाद मागितली तर बिघडले कुठे? त्यामुळे राज्यपाल हे राजकारण करतात, या राऊतांच्या दाव्यात अर्थ नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात जाण्यासाठी संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या. त्यावर पाटील म्हणाले की ते राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची माझ्याकडे तरी माहिती नाही आणि राऊत यांच्या सल्ल्याची भाजपला गरज नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख