घाबरून सगळेच रुग्णालयात यायला लागले तर जगात...! एम्सच्या संचालकांना भीती - We have to reduce the number of cases says dr randeep guleria | Politics Marathi News - Sarkarnama

घाबरून सगळेच रुग्णालयात यायला लागले तर जगात...! एम्सच्या संचालकांना भीती

वृत्तसंस्था
सोमवार, 26 एप्रिल 2021

कोरोना रिपोर्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर वाढतच चालला असून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे. रिपोर्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर अनेकजण रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. अॅाक्सीजनची गरज नसलेले रुग्णही दाखल होत असल्याने देशात अनेक ठिकाणी बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारकडून लक्षणे नसलेले व अॅाक्सीजनची गरज नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले जात आहे. 

देशातल मागील काही दिवसांत कोरोनाचा आकडा विक्रमी वेगाने वाढत आहे. मागील पाच दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जगात भारत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. सक्रीय रुग्णांचे प्रमाण वाढत असून अनेक जण रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. याबाबत एम्सचे संचालक डॅा. रणदीप गुलेरिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या लवकरात लवकर कमी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

पत्रकार परिषदेत बोलताना डॅा. गुलेरिया म्हणाले, कोरोना काळात आपण होम आयसोलेशनचा पर्याय वापरायला हवा. घाबरून प्रत्येक जण रुग्णालयात दाखल व्हायला लागला तर तर जगात असे कुठलेच इन्फास्ट्रक्चर नाही जे सर्वांना दाखल करून घेऊ शकेल. त्यामुळे आपल्याला कोरोना रुग्णांची संख्या कमी करायला हवी. रुग्णालयांचा वापर दक्ष राहून करायला हवा. अॅाक्सीजनचा आवश्यकतेनुसार वापर करणे खूप महत्वाचे आहे. सध्या लोक विनाकारण घाबरत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नीती आयोगाचे सदस्य डॅा. व्ही. के. पॅाल यांनीही नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी घरामध्ये कुटूंबासोबत असतानाही मास्क घालावेत. मास्क घालणे सध्या खूप महत्वाचे आहे. लोकांना तुमच्या घरी बोलवू नका, असेही ते म्हणाले. सध्याच्या आपत्कालीन स्थितीत लसीकरणाचा वेग कमी होऊन चालणार नाही. तर हा वेग आता वाढायला हवा, असेही ते म्हणाले. 

परदेशातून अॅाक्सीजन टँकर खरेदी तसेच भाडेतत्वावर घेतले जात आहे. पण या टँकरची वाहतूक हे मोठे आव्हान आहे. आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी सांगितले. देशात अॅाक्सीजनचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारकडून परदेशातून विविध साधनसामुग्री आणली जात आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख