लस कंपन्यांना एका चेकने 2500 ते 3000 कोटी रुपयांची रक्कम देऊ.... पण? - we can give Rs 2500 to 3000 crore to vaccine companies says Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

लस कंपन्यांना एका चेकने 2500 ते 3000 कोटी रुपयांची रक्कम देऊ.... पण?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

लसटंचाईमुळे अनेक ठिकाणचे लसीकरण थांबविण्याचा निर्णय़ 

मुंबई : लसटंचाईमुळे सरकार हतबल झाले आहे. राज्य सरकारने रोज आठ ते दहा लाख नागरिकांची लसीकरण करण्याची क्षमता तयार केली आहे. मात्र पुरेशी लस मिळत नाही. आम्ही एकाच चेकने सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची रक्कम लस कंपन्यांना देण्यास तयार आहोत. मात्र त्यांनी तेवढा पुरवठा आम्हाला केला पाहिजे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत घेतलेल्य़ा निर्णयांची माहिती टोपे यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की सरकारने लाॅकडाऊन हा 15 मे पर्यंत वाढवला आहे. त्याचे कठोर पालन होईल, यासाठी पोलिस दलाला आदेश दिले आहे. रेमडिसिव्हिर, लसीकरण, आॅक्सिजन पुरवठा, बेडची उपलब्धता या साऱ्या बाबींवर या बैठकीत चर्चा झाली. राज्यातील लसीकरण साठी गती वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन चर्चेला देखील आम्ही तयार आहोत. मात्र लस नसल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. 18 वर्षांवरील नागरिकांच्याही लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यास थोडा विलंब लागू शकेल. पहिली ऑर्डर आपण दिली होती. त्यामध्ये केवळ 3 लाख लस आल्या आहेत. एवढ्या लस एका दिवसांत संपतील. म्हणून आपण थोडी वाट पाहत आहोत. या कंपन्यांना आपण एकरकमी रक्कम देण्यास तयार आहोत. मात्र त्यांची तशी तयारी पाहिजे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या लसीचे दर कमी केले आहेत. त्याचा नक्कीच उपयोग होईल. कोविशिल्डचा दर 100 ने तर कोवॅक्सिनचा दर दोनने रुपयांनी कमी झाला आहे. सुमारे बारा कोट लस राज्य सरकारला खरेदी करायची आहे. त्यासाठी सुमारे पाच ते सहा हजार कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.

कोरोना रुग्णांची शेवटची यात्रा सन्मानाने व्हायला हवी, आशा सूचना देण्यात आल्या आहेत. आजच्या आढावा बैठकीत शव वाहिन्यांची संख्या वाढवण्याबाबत निर्णय झाल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांच्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

राज्यात आज ६८,५३७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर ६६,१५९ नव्या कोरोना रूग्णांचे निदान झाले आणि राज्यात ७७१ कोरोना बाधितांचा मृत्यू आज झाला.

पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद करण्यात आले आहे.  कोविड – १९ प्रतिबंधक लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दैनंदिन लसीकरण मोहिमेचे काटेकोर नियोजन करुनही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सद्यस्थितीत उपलब्ध लससाठा संपुष्टात आल्याने उद्या शुक्रवार, दिनांक ३० एप्रिल २०२१ ते रविवार, दिनांक २ मे २०२१ असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शनिवार, दिनांक १ मे २०२१ पासून नियोजित १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पुरेशा लससाठ्या अभावी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.  या दरम्यानच्या कालावधीत, महानगरपालिकेला लससाठा प्राप्त झाला व लसीकरण सुरु होणार असेल तर त्याची माहिती प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांतून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल. नोंदणीकृत पात्र व्यक्तिंनाच आता लस दिली जाणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख