...तर भारतात दोन लशींचे कॅाकटेल! पहिला अन् दुसरा डोस वेगवेगळ्या कंपनीचा - We are thinking to mix and match vaccine doses on a trial basis says Dr V K Paul | Politics Marathi News - Sarkarnama

...तर भारतात दोन लशींचे कॅाकटेल! पहिला अन् दुसरा डोस वेगवेगळ्या कंपनीचा

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

एका संशोधनानुसार दोन डोस वेगवेगळ्या लशींचे घेतले तरी त्याचा चांगलाच परिणाम दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे (Corona Vaccine) दोन डोस घेतल्याशिवाय शरीरात परिणामकारक अॅंटीबॅाडीज तयार होत नाहीत. पहिला डोस घेतल्यानंतर ठराविक कालावधीने त्याच लशीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. जगभरात तसाच प्रोटोकॅाल आहे. पण एका संशोधनानुसार दोन डोस वेगवेगळ्या लशींचे घेतले तरी त्याचा चांगलाच परिणाम दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी काही नागरिकांना चुकून दोन वेगळ्या लशींचे डोस देण्यात आले. त्यांनाही काही त्रास झाला नाही. त्यावर केंद्र सरकारनेही दोन लशींच्या कॅाकटेलवर विचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. (We are thinking to mix and match vaccine doses on a trial basis says Dr V K Paul)

भारतात सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही या तीन लशींचा वापर केला जात आहे. स्पुटनिक लशीचा वापर नुकताच सुरू करण्यात आला आहे. ही लस आयात करावी लागत असल्याने देशातील काही मोजक्याच खासगी रुग्णालयांत ही लस दिली जात आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेकदा एकाच केंद्रांवर दोन्ही लशी पुरवल्या जातात. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी 20 नागरिकांना पहिला डोस कोव्हॅक्सिनचा तर दुसरा डोस कोविशिल्डचा देण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधितांच्या आरोग्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण अद्याप त्यांना कोणताही त्रास झालेला नाही.

हेही वाचा : महाराष्ट्रात का वाढणार लॅाकडाऊन? ही आहेत दोन महत्वाची कारणं

स्पॅनिश विद्यापीठाने केलेल्या अभ्यासामध्येही दोन वेगळ्या लशींचे डोस घेतल्यानंतर काही विपरीत परिणाम होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये फायजर व अॅस्ट्राझेनेकाच्या लशींचे डोस देण्यात आले. हे दोन्ही डोस सुरक्षित आणि परिणामकारक ठरल्याचे नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं जगभरात दोन वेगळ्या लशींच्या वापरावर चर्चा सुरू झाली आहे. 

भारतातही विचार सुरू

नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॅाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोटोकॅालनुसार पहिला डोस ज्या कंपनीचा घेतला आहे, त्याच कंपनीचा दुसरा डोस घ्यायला हवा. जर एखाद्या व्यक्तीने दोन डोस वेगवेगळ्या कंपनीचे घेतले तरी घाबरण्याचे कारण नाही. हे सुरक्षित आहे. लशींच्या अशाप्रकारच्या चाचणी स्तरावरील वापराबाबत (Mix and Match) आम्ही विचार करत आहोत, असे पॅाल यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने बुधवारी २० कोटी डोसचा आकडा पार केला आहे. त्यासाठी १३० दिवसांचा कालावधी लागला आहे. अमेरिकेनंतर भारताने एवढ्या वेगाने लसीकरण केले आहे. लसीकरणामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील १ कोटी ३९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर ४५ वर्षांपुढील १५ कोटी नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख