बंगालच्या फाळणीची मागणी...अमित शहांची दोनदा भेट अन् राज्यपाल सात दिवस उत्तर बंगालमध्ये 

भाजपचेउत्तर बंगालमधील खासदार जॅान बारला यांनी बंगालच्या विभाजनाची मागणी केली आहे.
WB Governor Jagdeep Dhankhar will be from tomorrow on a visit to North Bengal
WB Governor Jagdeep Dhankhar will be from tomorrow on a visit to North Bengal

कोलकता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) विभाजनाची मागणी भाजपच्या काही खासदारांनी केली आहे. उत्तर बंगालचे विभाजन करून केंद्रशासित प्रदेश करण्याचा या खासदारांचा आग्रह आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनखर यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर आता ते उद्यापासून सात दिवस उत्तर बंगालच्या दौऱ्यावर निघाले आहे. त्यामुळे बंगालमध्ये बंगालच्या विभाजनावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (WB Governor Jagdeep Dhankhar will be from tomorrow on a visit to North Bengal) 

भाजपचे उत्तर बंगालमधील खासदार जॅान बारला यांनी बंगालच्या विभाजनाची मागणी केली आहे. त्यांना याच भागातील भाजपच्या आणखी एका खासदाराने पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगालचे विभाजन करून उत्तर बंगालला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यावा, अशी या खासदारांची मागणी आहे. बारला हे उत्तर बंगालमधील चार खासदारांपैकी एक आहेत. त्यांची मागणी जयंता रॅाय यांनीही उचलून धरली आहे. 

बारला यांच्या या मागणीवर आता भाजपमधूनच जोरदार विरोध सुरू झाला आहे. बारला यांच्या अलीपुरदौर मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मा यांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. त्यांच्यासह या मतदारसंघातील सात नेते पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बारला यांच्याविरोधात तृणमूलकडून आंदोलन केले जात आहे. 

त्यातच राज्यपाल पुढील सात दिवस उत्तर बंगालचा दौरा करणार आहेत. त्यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मागील आठवड्यात चार दिवस ते दिल्लीत होते. राष्ट्रपतींसह त्यांनी अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. अमित शहा यांना ते दोन दिवसांत दोनदा भेटले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या उत्तर बंगालच्या दौऱ्यामागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

राज्यपाल धनखर यांनी उत्तर बंगालच्या दौऱ्यानंतर दोन तासांतच विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओही ट्विटवर टाकला. बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचार आणि राज्य सरकारच्या भूमिकेबाबत त्यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात दिल्लीला जाण्यापूर्वी आदल्याचदिवशी सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या 50 आमदारांनी राज्यपालांची याच विषयावर भेट घेतली होती. 

दरम्यान, बारला यांच्या मागणीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही विरोध केला आहे. भाजपचा असा कोणताही अजेंडा नाही. बारला हे पक्ष कार्यकारिणीच्या कोणत्याही पदावर नाहीत, असे घोष म्हणाले. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे. निवडणुकीत परभव झाल्यानंतर ते बंगालची फाळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंगालच्या विभाजनात कुणाला अधिक रस आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com