वाझेने दोनच महिन्यांत 4 कोटी 70 लाख गोळा केले आणि ते देशमुखांच्या पीएंकडे दिले...

माजी गृहमंत्री अनिलदेशमुख यांचे पीए संजय पलांडे आणि कुंदन शिंदे हे एक जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत
sanjeev palande
sanjeev palande

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukj) यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांनी पोलिस खात्यांतील बदल्या आणि बार मालकांकडून कोट्यवधी रुपये उकळले असल्याचा आरोप आज अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ED) करण्यात आला. ज्या बार मालकांनी पैसे दिले त्यांचा जबाब नोंदविला असून बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे यानेही हे पैसे कुंदन शिंदेला दिल्याचे सांगितल्याचा दावा ईडीच्या वकिलाने न्यायालयापुढे केला.देशमुख यांनी वाझेला शंभर कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी केल्यानंतर हे सारे प्रकरण पुढे आले. 

पलांडे आणि शिंदे यांना काल रात्री ईडीने अटक केली. त्यानंतर पुढील कोठडीसाठी न्यायालयापुढे सादर करण्यात आले.  दोघांनाही एक  जुलैपर्यंत ईडी कस्टडी देण्यात आली. कोठडी मिळविण्यासाठी जोरदार युक्तिवाद झाले.  ईडीच्या म्हणण्यानुसार वाझे हा त्या वेळी मुंबई पोलिस दलातील सीआययू विभागाचा (crime investigation unit) अधिकारी होता. वाझेने मुंबई पोलिसांच्या झोन एक ते सातमधून जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान एक कोटी 64 लाख रुपये बारमालकांकडून उचलले. तसेच झोन 8 ते 12 मधून दोन कोटी 66 लाख रुपये गोळा केले. हे बार रात्री १२ नंतर सुरू ठेवण्यासाठी व आर्केस्ट्रा बार मध्ये नियमापेक्षा जास्त  नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी म्हणून देण्यात आले होते. हे पैसे कुंदन शिंदेला दिल्याचे वाझेने ईडीला सांगितले. या प्रकरणी दहा बारमालकांचा जबाब नोंदविला असल्याचे ईडीने स्पष्ट केेले.

देशमुख  आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे नागपूरात साई संस्था ट्रस्ट नावाची संस्था आहे. कुंदन हे देखील त्या संस्थेवर आहे. कुंदन हा देशमुखांच्या उपस्थितीत पैसे जमा करून घ्यायचा. तर पलांडें यांनी बदल्यांसंदर्भात पैसे जमा केले आहेत. या प्रकरणात सीबीआय भ्रष्टाचाराचा तपास करत आहे. तर ईडी पैशांचा व्यवहार कसा झाला, कुठे पैसे गुंतवण्यात आले याचा तपास करत असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. हे सारे काम एकदोघांचे नाही. यात अन्य आरोपींचा सहभाग असल्याने या दोघांना सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने केली.

या गैरव्यवहारातले पैसे कोलकत्ता येथील कंपनीत गुंतवले असल्याचा संशय आहे. बार मालकांकडून जमा केलेले पैसेही याच कंपन्यांमध्ये गुंतविल्याचा संशय असल्याची माहिती ईडीने दिली. याच प्रकरणाशी संबधित ईडीने कोलकत्याच्या मनोहर नगलिया आणि त्याचा नातेवाईक बाबुलाल बुंका यांच्याकडे चौकशी केली आहे. या दोघांनीही नागपूरच्या एका सीएने हे पैसे दिल्याचे ईडीला सांगितले. या 20 कोटीपैकी 10  कोटी रुपये जोडियाक डिल कोम कंपनीमार्फत वळवण्यात आले आहेत. बंगलोरच्या एका रिअल इस्टेड कंपनी असेट इन्फ्रा होमचीही चौकशी केली जात आहे. या कंपनीचा देशमुखांच्या गैरव्यवहाराची संबध असल्याचा संशय आहे, अशी सारी माहिती ईडीने न्यायालयापुढे मांडली.

वाझेने बार मालकांकडून गोळा केलेले  ४ कोटी ७० लाख हे कुंदन यांना दिले. कुंदन यांनी हे पैसे नागपूरहून हवालामार्फत दिल्लीला पाठवले  त्यानंतर ते पैसे श्री साई संस्था नागपूर येथे जमा झाल्याची माहिती ईडीने न्यायालयापुढे दिली. सोबत कंपनीच्या बँक अकाऊंटची माहिती सादर केली.

आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद

पलांडे यांच्या वकिलांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. आरोपींच्या वकिलांच्या घरीही ईडीने छापेमारी केल्याचा आरोप वकिलाने केला. ईडीने ठरवून हे सर्व घडविल्याचा ठपका वकिलाने ठेवला. तासनतास चौकशीनंतरही ईडीकडून अटक केली जाते.  अचानक मध्यरात्री अटक दाखवली जाते. वाझेने जे सेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पैसे उकळल्याचे सांगण्यात येते त्याची वेळ, ठिकाण हे नमूद केलेले नाही. पोलिस दलातल्या बदल्या या गृहसचिव, पोलिस महासंचालक यांच्या समितीच्या मान्यतेने होतात. त्याचा पलांडे यांच्याशी काय संबंध असा सवाल पलांडे यांच्या वकिलाने केला. 

पोलिस बदल्यांचे अधिकार हे गृहसचिव, पोलिस महासंचालक यांना असतात. त्यात कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. गृहमंत्री हे फक्त ती फाईलवर सही करून पुढे मुख्यमंञ्यांची या टेबलवर पाठवतात.  जर बदल्यांसाठी देशमुख जबाबदार असतील तर मुख्य सचिव कुंटे आणि तत्कालीन पोलिस महासंचालक संजय जैयस्वाल यांना सहआरोपी बनवणार का, असा युक्तीवाद कुंदन यांच्या वकिलांनी कोर्टात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com