शिवसेनेची कोंडी केलेले `मिशन पारनेर` मिलिंद नार्वेकर यांनी असे फत्ते केले...

शिवसेनेतल्या अन्य कोणत्याही बडया नेत्याला माहीत नसताना नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्याशी संपर्क साधला.
milind narvekar-ajit pawar.
milind narvekar-ajit pawar.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेचे पारनेरमधील पाच नगरसेवक पक्षात नेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले होते. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत चार जुलै रोजी हे पक्षांतरनाट्य घडले होते.

हे नगरसेवक परत संपर्कात आले पाहिजेत, अशी इच्छा मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनीही प्रयत्न करतो, असा शब्द दिला. मित्रपक्षच असे फोडफोडी करायला लागल्यावर त्याचा वेगळा संदेश शिवसेनेच्या कार्यकर्त्यात जाईल, याची धास्ती शिवसेनेच्या नेतृत्त्वाला झाले. त्यामुळे या विषयावर पक्ष ठाम असल्याचे नार्वेकरांना सांगण्यात आले.  हे नगरसेवक भाजपमध्ये निघाले होते, म्हणून आम्ही त्यांना राष्ट्रवादीत घेतले, असा दावा लंके यांनी या पक्षांतर नाट्यावर केला होता. तेथेच नार्वेकर यांना आपली बाजू कशी मांडायची, याची कल्पना सुचली. 

शिवसेनेतल्या अन्य कोणत्याही बडया नेत्याला माहीत नसताना नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. अजितदादांनी पण लंके यांनी जे सांगितले ते नार्वेकर यांना ऐकवले. ``आघाडी धर्माला अनुसरून या नगरसेवकांना प्रवेश देण्यास आपण उत्सुक नव्हतोच. पण आमदार लंके यांनी ते अन्यथा भाजपमध्ये जातील हे सांगितल्याने मग त्यांचा प्रवेश केल्याचे नमूद केला, असेच अजितदादांनी सांगितले. ठाकरे  या नगरसेवकांना परत घेण्यास इच्छुक आहेत, असे नार्वेकरांनी दादांना सांगितले. त्यावर विचार करू, असे उत्तर आले. पण त्यामागची घाई सांगत तुम्हाला भेटायला लगेच बारामतीला येतो, असे नार्वेकरांनी म्हटल्यावर दादांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये, `तुम्ही यायची गरज नाही. मी बघतो, असे सांगून संभाषण संपवले. 

अशी सारी शिष्टाई सुरू असतानाच मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचा विषय पुढे आला. गृहमंत्र्यांनी केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याने तेथे नवीन वादाला तोंड फुटल्याचे चित्र निर्माण झाले होते. नार्वेकरांनीही इकडे पुन्हा `मिशन पारनेर` साठी जोर लावला होता. मंगळवारी (ता. सात जुलै) रात्री सूत्रे फिरली. अजित पवारांनी लंकेंना फोन लावला आणि नगरसेवकांना मुंबईत घेऊन येण्यास सांगितले. नार्वेकरांनाही निरोप गेला आणि मातोश्रीलाही तसे सांगण्यात आले.

पाच नगरसेवक मुंबईत आधी उपमुख्यमंत्री दालनात अजितदादांना भेटले. तेथेही नार्वेकर पोहोचले. दादांनी महाआघाडी मजबूत करण्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला नाही. नार्वेकरांनीही मग या सर्वांना घेऊन मातोश्री गाठली. तेथे मुख्यमंत्र्यांनी 45 मिनिटांचा वेळ या सर्वांना दिला. प्रत्येक नगरसेवकाचे म्हणणे ऐकून घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत सर्वांचे फोटोसेशन झाले. त्यानंतर `मिशन पारनेर` यशस्वी झाल्याचा सुस्करा नार्वेकर यांनी सोडला. 

शिवसेना व भाजप युती सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात दुवा म्हणून काम करणारे नार्वेकरच पुन्हा ठाकरे आणि अजितदादांमध्ये संपर्क साखळी असल्याचे स्पष्ट झाले. या नगरसेवकांना परत आणण्यासाठी आपला पक्ष प्रयत्न करेल, असे शिवसेना नेत्यांनाही वाटत नव्हते. मात्र नार्वेकरांनी तो समज दूर केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com