वारकऱ्यांकडून 'या' निर्णयांचे स्वागत...

आषाढ शुद्ध दशमीलाच पालखी सोहळा हेलिकॉप्टर, बस अथवा पर्याप्त सोयीद्वारे मोजक्याच वारकरी प्रतिनिधींसह संतांच्या पादुका पंढरपूरला पोचणार आहे.
4Sant_Tukaram_Maharaj_Palkhi.
4Sant_Tukaram_Maharaj_Palkhi.

आळंदी : आषाढ शुद्ध दशमीलाच पालखी सोहळा हेलिकॉप्टर, बस अथवा पर्याप्त सोयीद्वारे मोजक्याच वारकरी प्रतिनिधींसह संतांच्या पादुका पंढरपूरला पोचणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे वारक-यांनी स्वागत केले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेली दक्षता आणि वारक-यांच्या विवेकाचे दर्शन घडले. 
 
कोरोनाचा फटका थेट पायी वारीला बसला आहे. आषाढी पायी वारी सोहळ्याऐवजी संतांच्या पालख्यांच्या पादुकांचे आपापल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीच प्रस्थान करावे. मात्र पायी वारी निघणार नाही. नंतर थेट आषाढ शुद्ध दशमीलाच पालखी सोहळा हेलिकॉप्टर, बस अथवा पर्याप्त सोयीद्वारे मोजक्याच वारकरी प्रतिनिधींसह संतांच्या पादुका पंढरपूरला पोचणार आहे. 
 
संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत एकनाथ या प्रमुख चार पालख्यांनी जागेवरच प्रस्थान सोहळा पार पाडून पालखी आपापल्या गावात ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि थेट दशमीच्या दिवशी पंढरीत पोचायचा निर्णय घेतला. देहू, आळंदी देवस्थान हे दोन्ही देवस्थान मोठे आणि पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने वारक-यांबरोबरच देवस्थान आणि सरकारपुढे मोठा पेच होता. मात्र, या दोन्ही पालख्या ज्या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जातात, त्याठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला. खुद्द पंढरपूरात कोरोनाचे रूग्ण आहे. मुंबईतही कोरोनाने कहर केला. यामुळे सरकारने पालखी सोहळ्यावर बंधने घातली. अखेर अडचणींवर मात करणारा तोच खरा वारकरी. हे वारक-यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून दाखवले.  


वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी माउलींच्या पादुका गाडीद्वारे थेट पंढरपुरात जावून वारी पूर्ण करणे तर देहू देवस्थाननेही मोजक्या वारक-यांसोबत आम्हाला जावू द्या अशी मागणी केली होती. वारक-यांच्या रीमधे री ओढत विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनीही पायी वारीबाबत विधाने केली. खरेतर यामध्ये राजकारणाचा थोडा वास आला होता. मात्र, वस्तूस्थितीचा विचार करून  सरकारने यावर गंभीर विचार केला आणि पायी वारीबाबत बंदीचा निर्णय घेतला. मात्र, सरकारच्या या निर्णयाच्या निर्बंधामुळे 
  जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.
  आनंदे केशवा भेटताची, 

 या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी...अशा या परमसुखाला वारकरी पायी वारी नसल्याने मुकले. 


सोहळ्यातील वैभव अनुभवता येणार नाही....


आळंदीतील नयनरम्य माउलींचा पालखी प्रस्थान सोहळ्याबरोबरच सोहळ्यातील चांदीचे रथ आणि त्यामधे ठेवलेल्या संतांच्या पादुका, उर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व, अश्वांनी घेतलेले उभ्या आणि गोल रिंगणातील नेत्रदिपक धाव, नीरा स्नान, समाज आरती, कीर्तन, जागर, पहाटेची पवमान पुजा, पालखी तळावरील दिंडी समाज संघटनेची बैठक, जागोजागी केले जाणारे अन्नदान, स्वागत, गावागावातील उत्साही तरूणाई आणि माहेरवासिनींचा दर्शनासाठीची झुंबड, गावाला आलेले जत्रेचे स्वरूप, आणि सोबत वाखरी ते पंढरपूर या वाटचालतील लाखोंच्या संख्येने जमलेला वारक-यांचा मेळा यंदाच्या वर्षी दिसणार नाही. एकंदर यंदाच्या वाटचालीत अल्प वारक-यांना संधी असल्याने वैभव याची डोळा याची देहू अनुभवण्यास मिळणार नाही.

 यापूर्वीही अनेकदा वारी खंडित झाली 

घरात अडचण आली नैसर्गिक आपत्ती आली तरी पंढरीची वारी चुकली नाही. मात्र, सार्वजनिक आपत्ती आली की सरकारकडून वेळोवेळी मज्जाव केला गेला. १८३१ मध्ये पालखी सोहळा पंढरपूरला गेला नव्हता. कारण त्यावेळी माउली आणि संत तुकारामांची पालखी नेण्यावरून संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये वाद निर्माण झाला होता. १८६५ मध्ये कॉलराची साथ आली. १८९८ व १९५६ ला चंद्रभागेला महापूर आला. संपूर्ण पंढरीला पुराच्या पाण्याचा विळखा पडला. तरीही पालख्या वाखरीला थांबवून फक्त मानकरी होडीतून पादुका पांडुरंगाच्या भेटीला घेऊन गेले. १९१८ व १९४६ ला प्लेगची साथ आली तरीही संतांच्या पादुका विठूरायाच्या भेटीला गेल्या. १९४२ -४५ दुसरे महायुद्ध आणि चलेजाव चळवळ यामुळे ब्रिटिशांनी सामुहिक वारीवर बंदी घातली होती. 

मागील इतिहास पाहिला तर अनेक मोठी संकटे आली तरी वारी चुकली नाही. आज मात्र देशातच नाही तर जगभरात कोरोनाने थैमान घातले. हजारो लोक मृत्यू पावले. तर हजारो लोक उपचार घेत आहेत. संसर्गाने होणारा आजार असल्याने शासन दक्षता घेत आहे. यंदा चैत्री वारीवर बंदी घातली.
 मात्र, सध्याची परिस्थीतीनुसार लाखोंचा,हजारोंचाच काय पण शंभर लोक एकत्र आले तरी त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यात पोलिस आणि आरोग्य विभागावर प्रचंड शारिरिक आणि मानसिक ताण आहे. त्यातच पायी वारी सोहळ्याचे नियोजन करायचे झाल्यास सगळी यंत्रणाच विस्कळित होईल. पुढचे संकट लक्षात घेता सरकारने वारीवर आपत्कालिन परिस्थिती पाहून वारक-यांना विचारात घेत निर्बंध घातले.


प्रस्थानच्या दिवशी नियोजन महत्वाचे

ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. १३ जून ) आळंदीतून माउलींच्या पालखीचे प्रस्थान होते. मात्र, यंदा पायी सोहळा नसल्याने दशमीपर्यंत अठरा दिवस पालखीचा मुक्काम आळंदीतच राहिल. फक्त प्रस्थानच्या दिवशीचे नियोजन आता देवस्थान आणि प्रशासनाला करावे लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com