मनातून जे हवं होतं ते मिळालं..... गृहखात्याची पाटिलकी दिलीप वळसेंकडे - walase patil becomes new home minister of Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

मनातून जे हवं होतं ते मिळालं..... गृहखात्याची पाटिलकी दिलीप वळसेंकडे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

नव्या खात्यावर वळसे पाटील प्रभाव टाकणार?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला असून त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. याबाबतचे पत्र ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना पाठवले आहे.

वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार हे बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिले.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे हे पद जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होतीच. याबाबत सरकारनामाने वृत्त दिले होते. ते खरे ठरले आहे. शरद पवार यांचे पीए म्हणून राजकारणातील धडे गिरवणारे वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. 1990 पासून ते 2019 या कालावधीत सात वेळा निवडून आले. विधानसभेचे माजी अध्यक्ष, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी कारभार सांभाळला. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. आता आर. आर. पाटील यांच्यानंतर गृहमंत्र्यांची पाटिलकी वळसेंकडे आली आहे.  

परमबीरसिंह यांनी शंभर कोटी रुपयांच्या हफ्तेवसुलीच्या आरोपीचाी सीबीआय चौकशी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. गृह खाते रिक्त ठेवणे हे योग्य नसल्याने तातडीने या पदाची सूत्रे वळसे पाटलांकडे आली आहेत. 

राज्यात दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच गृहखाते हे जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाणार अशी चर्चा होती. वळसे पाटलांना याबाबत विचारणा देखील झाल्याचे सांगण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी तब्येतीचे कारण सांगितले. त्यानंतर पवार यांनी दुसऱ्या नावांवर विचार सुरू केला. वळसे पाटील त्यांना परत जाऊन भेटले. पण वळसेंनी एकदा एकदा नकार दिल्याने ते खाते शरद पवारांनी अनिल देशमुख यांना दिले. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे तालेवार नेते असताना पुन्हा आपल्याकडे गृहखाते घेऊन अजितदादांना स्पर्धक म्हणून कशाला पुढे यायचे, असाही विचार वळसे पाटील यांनी तेव्हा केला असावा, अशीही चर्चा तेव्हा होती. आता शरद पवारांनी सांगितल्यानंतर त्या पदाचा कार्यभार त्यांच्याकडे आला आहे. त्यांना हे पद मनापासून हवे होते. पण तेव्हा ते अजित पवारांना नाराज करण्याच्या तयारीत नव्हते. आता मात्र त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार नवीन आव्हान स्वीकारले आहे. 

सरकार स्थापनेपासून वळसे पाटील `लो प्रोफाईल` राहिले. सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र तेथे ते पुरेसा वेळ देत नसल्याची तक्रार झाली. त्यामुळे त्यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेण्यात आली आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ती देण्यात आली. ती जबाबदारी गेल्यानंतरही वळसे पाटलांनी फारसी कुरकुर केली नाही. राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेत ते फारसे पुढे येत नव्हते. आता मात्र ते पुन्हा हाय प्रोफाईल मंत्री झाले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख