एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर... - Vitthal Rukmini temple decorated with a ton of flowers | Politics Marathi News - Sarkarnama

एक टन फुलांनी सजले विठ्ठल रुक्मिणी मंदिर...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

झेंडू, आष्टर, मोगरा, गुलछडी, गुलाब अशा विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. रुक्मिणी मातेला ही विविध फुलांनी सजवले आहे.

पंढरपूर : पुरुषोत्तम अर्थात अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या गाभार्यात झेंडू, आष्टर, मोगरा, गुलछडी, गुलाब अशा विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. रुक्मिणी मातेला ही विविध फुलांनी सजवले आहे.

देवाचा गाभारा, सोळखांबी, प्रवेश द्वारावर फुलांची तोरणे बांधून सजावट करण्यात आली आहे. जवळपास एक टन फुलांनी मंदिर सजवले आहे. कमला एकादशीच्या निमित्ताने आज  विठ्ठलाला जांभळया रंगाचा आंगरखा तर पिवळया रंगाचे धोतर असा पोषाख परिधान करण्यात आला आहे. रुक्मिणी मातेला निळया रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे.

विविध फुलांच्या सजावटीने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. सभा मंडपात सप्तरंगातील रांगोळयांनी साकारलेली विठ्ठलाची प्रतिमा लक्षवेधी ठरली आहे. पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी ही फुलांची सजावट केली आहे.
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विठ्ठल  रुक्मिणी  मंदिर दर्शनासाठी बंद आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. दरवर्षी अधिक मासात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यावेळी मात्र दर्शन बंद असल्याने भाविकांना देखील आता विठ्ठल दर्शनाची आता ओढ लागली आहे.

हेही वाचा : मराठा आरक्षणाच्यानिमित्ताने विनायक मेटे, शिवेंद्रसिंहराजे यांची वज्रमुठ
 
सातारा : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे व संघटीत लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली व ठोस दिशा मिळेल. राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे. पुण्याच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यापध्दतीने आम्ही काम करू, असा विश्वास साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरूची या निवासस्थानी भेट घेतली. तसेच मराठा समाजाचे विचारमंथन बैठक पुणे येथे तीन ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीचे निमंत्रणही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले. तसेच याविषयावर चर्चा ही केली.त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असून यामध्ये कोणत्याही राजकारणाचा हा भाग नाही. मी स्वतः मराठा समाजाचा एक घटक असून या समाजाने आम्हाला मोठे केलेले आहे. त्या या नियोजन बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख