अडगळीत पडल्यानंतर शांत राहलेले विनोद तावडे `यामुळे` पुन्हा प्रकाशझोतात - Vinod Tawde who remained calm after getting sidelined is in the spotlight again | Politics Marathi News - Sarkarnama

अडगळीत पडल्यानंतर शांत राहलेले विनोद तावडे `यामुळे` पुन्हा प्रकाशझोतात

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रातील आठ जणांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळाली आहे...

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित "टीम जे पी नड्डा' अखेर आज जाहीर करण्यात आली. भाजपच्या राज्य नेतृत्वाशी पंगा घेणाऱ्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे या माजी मंत्र्यांना राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडलेले तावडे आता पुन्हा मुख्य प्रवाहात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीटही न मिळालेले तावडे नाराज होते. मात्र एकनाथ खडसे किंवा पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे त्यांनी अजिबात त्याबद्दल जाहीरपणे तक्रार केली नव्हती. तसेच आपली नाराजी उघडपणे व्यक्त होणार नाही, याचीही काळजी घेतली होती. त्याचे फळ त्यांना मिळाल्याचे आजच्या नियुक्तीनंतर स्पष्ट झाले. 

तावडे हे 2014 च्या आधी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना गृहमंत्री होत येईल, अशी अपेक्षा होती. त्यांनी ती बोलूनही दाखवली होती. प्रत्यक्षात त्यांना शिक्षण खाते मिळाले. या खात्यांत वैद्यकीय, शालेय, उच्च शिक्षण, क्रिडा, सांस्कृतिक अशा विभागांचा समावेश होता.  त्यानंतर त्यांच्याकडील एक-एक खाते फडणविसांनी इतर मंत्र्यांना दिले. तेव्हापासून तावडे यांचे पंख छाटले जात असल्याचे बोलले जात होते. आधी वैद्यकीय शिक्षण हे गिरीश महाजनांकडे देण्यात आले. शालेय शिक्षण हे खाते सरकारच्या अखेरच्या टप्प्यात आशिष शेलारांना मिळाले. विधानसभा निवडणुकीत तर तावडेंना तिकिटही मिळाले नाही. या `पडझडी`नंतर ते आता पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात आले आहेत. त्यांना कोणती जबाबदारी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.  

नंदुरबारच्या खासदार हीना गावित यांना राष्ट्रीय प्रवक्तेपदी बढती देण्यात आली असून व्ही. सतीश (सहसंघटनमंत्री), सुनील देवधर (सचिव) व जमाल सिद्दीकी (अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष) या मराठी चेहऱ्यांनाही नव्या कार्यकारिणीत जागा मिळाली आहे. पुढील महिन्यात नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक दिल्ली किंवा पाटण्यात होण्याची शक्‍यता आहे.

सुमारे 68 जणांच्या या कार्यकारिणीत हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या म्हणजे फक्त 6-7 मराठी चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. शाम जाजू यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून हटवून त्यांना पूर्णवेळ दिल्लीची जबाबदारी देण्याचे पक्षनेतृत्वाने ठरविल्याचे दिसते. विजया रहाटकर व पूनम महाजन यांच्याकडून अनुक्रमे महिला मोर्चा व युवा मोर्चाची अध्यक्षपदे काढून घेण्यात आली आहेत. महाजन या आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात "टीम मोदी' च्या सदस्या असतील असे समजते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कार्यकारिणीचे स्वागत करताना, भाजपचे नवे पदाधिकारी गरीब-शोषित वर्गासाठी मजबुतीने काम करतील अशी आशा व्यक्त केली आहे. बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या टीमची रचना करताना नव्या चेहऱ्यांना जास्तीत जास्त स्थान दिल्याचे दिसून येते. वसुंधरा राजे (राजस्थान) व रमणसिंह (छत्तीसगड) या माजी मुख्यमंत्र्यांना उपाध्यक्षपद देऊन दिल्लीत बोलावून घेण्याचे प्रयत्न अजून सुरू  आहेत.

लोकसभेतील सर्वांत तरूण खासदार असलेले बंगळुरूच तेजस्वी सूर्या यांच्याकडे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले आहे. थेट पंतप्रधानांपर्यंत तक्रारी जाऊनही अमित मालवीय यांच्याकडे आयटी विभागाचे प्रमुखपद कायम ठेवण्यात आले आहे. राजीवप्रताप रूडी , राज्यवर्धन राठोड या माजी केंद्रीय मंत्र्यांना राष्ट्रीय प्रवक्ते करण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या मिडीया सेलमध्ये वर्षानुवर्षे काम केल्यावर भाजपमध्ये आलेले टॉम वडक्कन यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांच्या यादीत सर्वाधिक म्हणजे तब्बल 23 प्रवक्ते आहेत. अनिल बलुनी यांना मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी बढती मिळाली आहे. त्यांच्याशिवाय अनिल बलूनी, संजय मयूख, डॉ संबित पात्रा, सुधांशु त्रिवेदी और शाहनवाज हुसेन हे 5 राष्ट्रीय प्रवक्ते असतील. या यादीतच राजीव चंद्रशेखर, जफर इस्लाम, अपराजिता सरंगी, राजू बिश्‍त हे खासदार तसेच मुंबईच्या संजू वर्मा, के. के. शर्मा व नुपूर शर्मा यांनाही स्थान मिळाले आहे. व्ही सतीश नावाने प्रचलित असलेले सतीश वेलणकर हे सहसंघटनमंत्री आहेत.

बंगालच्या निवडणुका लक्षात घेता कैलास विजयवर्गीय याना महामंत्री (सरचिटणीस) करण्यात आले आहे. या पदावरून राम माधव, मुरलीधर राव, अनिल जैन व सरोज पांडे यांना हटवून दुष्यंत कुमार गौतम, डी पुरंदरेश्वरी, सी. टी. रवी व तरुण चुग हे नवे चेहरे आले आहेत. राधा मोहन सिंह, मुकुल रॉय, रेखा वर्मा, अन्नपूर्णा देवी, भारती भेन शियाल, डी. के. अरुणा, एम चूबाआव, अब्दुल्ला कुट्टी नवे राष्ट्रीय उपाध्यक्ष असतील.

के लक्ष्मण (ओबीसी आघाडी), जमाल सिद्धीकी (अल्पसंख्यांक) लाल सिंह आर्य (एस.सी) समीर ओरांव (एस.टी) हे विविध आघाड्यांचे नवे राष्ट्रीय प्रमुख आहेत.

भाजप कार्यकारिणीत महाराष्ट्र ः
व्ही सतीश ( सहसंघटनमंत्री)
जमाल सिद्दीकी (अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष)
विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर व विजया रहाटकर (राष्ट्रीय मंत्री)
हीना गावित (प्रवक्‍त्या)
---------
1- अध्यक्ष (नड्डा)
12- राष्ट्रीय उपाध्यक्ष
4- संघटनमंत्री
8 -महामंत्री
13 मंत्री
7 विविध आघाड्यांचे अध्यक्ष
2 खजिनदार
23 प्रवक्ते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख