निवडणुकीत पाय धरणाऱ्या गावपुढाऱ्यांचे कोरोनाकाळात दर्शनही होईना - The village leaders disappeared during the Corona period | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीत पाय धरणाऱ्या गावपुढाऱ्यांचे कोरोनाकाळात दर्शनही होईना

आशिष निंबोरे 
मंगळवार, 25 मे 2021

निवडणूक काळात समाज माध्यमांमध्ये गर्दी करणारे स्वयंघोषित नेते, पुढारी, उमेदवार फक्त निवडणुकीपुरते हवा करतात आणि नंतर संकट काळात गायब होतात.

मिरजगाव : 'ध्यास परिवर्तनाचा..गावाच्या विकासाचा', चला परिवर्तनाचे शिलेदार बनु, स्मार्ट गावचे स्वप्न पुरे करू', 'आता चाहूल बदलाची', प्रारंभ युवा पर्वाचा', लक्ष ग्रामपंचायत निवडणूक २०२१', (Gram Panchayat Election 2021), अश्या घोषणांचा पाऊस पाडत मागील काही महिन्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आश्वासनांची खैरात करत अनेक उमदेवार निवडून येऊन ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच झाले. (The village leaders disappeared during the Corona period)

अनेकांना पराभव देखील पचवावा लागला. प्रचार काळात गावाच्या सर्वांगीण विकासाच्या आणि सदैव जनतेसोबत राहण्याच्या आणाभाका खाणारे हौशी उमेदवार आणि स्वयंघोषित नेते आता मात्र अडचणीच्या काळात बिळात लपून बसल्याचे चित्र आहे. काही अपवाद वगळता बहुतांशी स्वयंघोषित नेते  (village leader) कोरोना काळात सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून गायब झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

हे ही वाचा : संतप्त आंदोलनकर्त्यांनी जयंत पाटलांचा पुतळा जाळला 

निवडणूक काळात समाज माध्यमांमध्ये गर्दी करणारे स्वयंघोषित नेते, पुढारी, उमेदवार फक्त निवडणुकीपुरते हवा करतात आणि नंतर संकट काळात गायब होतात, त्यामुळे निवडणुकीनंतर हे नेते आणि कार्यकर्ते जातात तरी कोठे? असा सवाल उपस्थित होत आहेत. कोरोना (Covid-19) काळात संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. हातावर पोट असणारे व छोटे उद्योग करणाऱ्या हजारो हात आता रिकामे आहेत. उपासमारीची वेळ अनेकांवर आली आहे. दवाखान्यात उपचारा अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. दवाखान्यात बेड मिळत नाहीत, गरजूंना मदत मिळत नाही. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांना दवाखान्याच्या दारात पोचण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागत आहेत. अश्या कठीण परिस्थितीत मात्र 'सदैव जनतेसोबत'चा नारा देणारे हात वर करत आहेत. 

निवडणूक असली की महिनाभर आधीपासूनच परिसरातील हॉटेलमध्ये गर्दी पाहायला मिळते. मांसाहाराच्या पार्ट्या सुरु होतात, हाडकांचे ढीग आणि दारूच्या बाटल्यांची रास सर्वत्र पाहायला मिळते. मतदानाच्या आधल्या रात्री रात्रीचा दिवस करून कार्यकर्ते पैश्याचे वाटप करत असतात. निवडणुकीच्या दिवशी तर अगदी जावयाप्रमाणे मतदारांची उठाठेव चालू असते. पोट भरण्यासाठी बाहेर गावी गेलेल्या मतदारांची महिनाभर आपुलकीने विचारपूस केली जाते, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते. मतदान केंद्रावर मतदान करायला त्रास होऊ नये म्हणून बुथ उभारले जातात. 

हे ही वाचा : यास चक्रीवादळ 'अम्फान'लाही मागे टाकणार! तीव्रता वाढण्याची भीती

आता मात्र कोरोना काळात खरी गरज असताना गरजूंना दोन किलो धान्य देण्याची दानत देखील या गावपातळीवरील काही नेत्यांमध्ये दिसत नाही. वास्तविक पाहता आणीबाणीच्या या काळात मतदान दिवसांसारखी मदतीची गरज सामान्य नागरिकांना जास्त आहे. रुग्णांना उपचार मिळावेत, अतिगंभीर रुग्णांना ऑक्सिजन व खाटा मिळाव्यात बेरोजगारांना अन्नधान्य मिळावे यासाठी पक्षनिहाय बुथ उभारून नागरिकांना मदत करावी, अशीच माफक अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या काळात समाज माध्यमांमध्ये सध्या मात्र गावा गावातील अश्या अजब..गजब...पुढाऱ्यांची चांगलीच चर्चा सुरु आहे.

सामाजिक संघटनांनी दाखविला आरसा-

कोरोना काळात काही पुढाऱ्यांनी जरी सामान्य जनतेकडे पाठ फिरवली असली तरी परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना रुग्णांची सेवा सुरु केली आहे. आर्थिक मदतीसोबतच अन्नधान्य आणि जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा, रुग्णांना दवाखान्यात पोहचविणे, त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती, रक्तदान शिबीर, प्लाझमा दान अशी लोकप्रतिनिधींची अनेक कामे कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता या सामाजिक संघटना सेवाभावाने करत आहेत.

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख