रुपानी सरकारच्या अपयशाची जबाबदारी मोदींचीच ; कॉग्रेसचा हल्लाबोल  

मुख्यमंत्री या नात्याने विजय रुपानी अयशस्वी ठरल्याचा त्यांना राग असेल तर ही सर्वस्वी जबाबदारी मोदींची आहे.
Sarkarnama (93).jpg
Sarkarnama (93).jpg

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी Vijay Rupani यांनी काल अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना रूपानी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून हा भाजपच्या परंपरेचा हा भाग असल्याचे रुपानी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी चौघांची नावे आघाडीवर असून त्यावर आज  (ता.१२) शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

विजय रुपानी यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी  Narendra Modi आणि गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांचे अपयश असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेसने केला आहे. गुजरातमधील रुपानी सरकारच्या अपयशाची सर्वस्वी जबाबदारी पंतप्रधान मोदींचीच आहे, असे शरसंधान कॉंग्रेसचे मुख्यप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले.

रुपानी यांनी काल राजभवनावर जावून राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सोपवला. या राजीनाम्याने गुजरातच्या राजकीय चर्चेला उधाण आले. राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना रूपानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. राज्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुका लढवत आहे आणि २०२२ मधील निवडणूक देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लढली जाईल, असेही स्पष्ट केले.

गुजरातमधील खळबळजनक राजकीय घडामोडींवरून कॉंग्रेस नेते सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरोधात तोफ डागतानाच भाजपशासित राज्यांमधील सुंदोपसुंदीकडे दुर्लक्ष करण्यावरून प्रसारमाध्यमांनाही सुरजेवाला यांनी लक्ष्य केले. हे (रुपानी यांचा राजीनामा) पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाचे सरळसरळ अपयश आहे. मुख्यमंत्री या नात्याने विजय रुपानी अयशस्वी ठरल्याचा त्यांना राग असेल तर ही सर्वस्वी जबाबदारी मोदींची आहे. 

गांधी- पटेलांची कर्मभूमी असलेल्या गुजरातची एकाधिकारशाहीने चालणाऱ्या भाजपपासून मुक्ती करण्याची वेळ आली आहे. यातून दोन गोष्टी अधोरेखित झाल्या आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्कलह सुरू आहे, मग ते गुजरात असो अथवा राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम किंवा हरियाना असो. भाजपमधील या गृहकलहाबद्दल भक्त मीडिया मौन असून त्यांची एकमेव जबाबदारी म्हणजे विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आहे, असाही टोला सुरजेवाला यांनी लगावला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com