पोलिस अधिकारी सचिन वाझेंवरून फडणवीस, देशमुख आणि पटोले यांच्यात `वाजले` - Verbal clash between Anil Deshmukh and Fadnavis On police officer Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस अधिकारी सचिन वाझेंवरून फडणवीस, देशमुख आणि पटोले यांच्यात `वाजले`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 5 मार्च 2021

महत्वाचा दुवा असलेल्या हिरेन यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा विरोधी पक्षाचा दावा... 

मुंबई : मुंबई क्राईम ब्रॅंचचे अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे नाव विधानसभेत गाजले. प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित गाडी आढळून आली होती. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वाझे आणि मनसुख हिरेन यांचे या आधी फोनवरून संभाषण झाले होते. या प्रकरणातील हिरेन हा महत्वाचा दुवा होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांनी केला.

अंबानी यांच्या बंगल्यासमोर जिलेटिन असलेली गाडी सापडल्यानंतर वाझे हे सर्वात प्रथम तेथे पोहोचले होते. या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडेच होता. मात्र हा तपास त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. त्यामुळे हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. वाझे यांच्या नावाचा दोन-तीन वेळा उल्लेख झाल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यावर टोला मारला. वाझे यांनी रिपब्लिक टिव्हिचे अर्णव गोस्वामी यांना अटक केली होती. त्यामुळे तुमचा वाझेंवर राग आहे का, असा सवाल देशमुख यांनी विचारला. तो वाझे काळा की गोरा? त्याचे नाव घेऊन आम्हाला धमकावता का, असाही प्रश्न विरोधी सदस्यांनी केला.

नाना पटोले, आशिष शेलार, सुधीर मुनगंटिवार, संसदिय कामकाजमंत्री अनिल परब यांच्यात शाब्दित चकमक उडाली. एनआयएकडे तपास देण्याला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. भाजपच्या नेत्यांनी एनआयएकडे तपास देण्यासाठी आग्रह धरल्याने पटोले यांनी केंद्र सरकारला सांगून तुम्ही हा तपास एनआयएकडे न्यावा, असा सल्ला दिला. त्यावर फडणवीस यांनी आम्ही आता केंद्र सरकारला सांगून हा तपास एनआएयकडे द्यावा, असे त्यांनी सांगू.

अनिल देशमुख म्हणाले की  हिरेनच्या ताब्यात सॅम पीटर न्यूटनची ही स्काॅर्पिओ गाडी होती. मूळ मालकाने गॅरेजचे पैसे दिले नाही म्हणून त्यांची गाडी यांच्या ताब्यात होती. रेतीबंदर या ठिकणी त्यांचा मृतदेह सापडला. अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणे पोलिस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील.

यावर फडणवीस म्हणाले की तपास अधिकारी सचिन वाझे तात्काळ त्या ठिकणी पोहचले. यात काही योगायोग आहे का? हिरेन यांचे हात पाठिमागे बांधलेले होते. आत्महत्या हात बांधून होत नाही. त्यामुळे एनआयएच्या माध्यमातून तपास झाला पाहिजे. गृहमंत्र्यांना अधिकाऱ्यांना  काय ब्रिफिंग झाले हे माहित नाही. पोलिस स्टेटमेंटमध्ये विसंगती आहे.

अनिल परब म्हणाले की विरोधी पक्षनेते यांनी हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. मात्र आत्महत्या झालेला प्रत्येक व्यक्ती खरेच बोलेल, असे नाही. फडणवीस हे गृहमंत्री होते. पोलिसांच्या विश्वासावर त्यांनी राज्य केले. आताच त्यांचा मुंबई पोलिसांवर अविश्वास का?

सचिन वाझे हे मुंबई गुन्हे शाखेतील गाजलेले अधिकारी आहेत. ते गेली 16 वर्षे निलंबित होते. त्यांनी राजकारणात जाण्याचाही प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि क्राईम ब्रॅंच देण्यात आली.  

हिरेन चार दिवसांपासून बेपत्ता!

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवलेली गाडी आढळली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या गाडीच्या मालकाचा पोलिसांनी शोध घेतला होता. त्यावेळी ती गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात असल्याचे समोर आले होती. ती गाडी काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्याचेही समोर आले होते. हिरेन हे कालपासून (ता.4) बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी ते बेतत्ता झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात आज केली होती. ठाणे पोलिसांना आज हिरेन यांचा मृतदेह रेतीबंदर येथे खाडीत सापडला. त्यांनी खाडीत उडी मारुन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने हिरेन यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हिरेन यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. 

जिलेटीन प्रामुख्याने भूसुरुंग स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येतात. या गाडीमध्ये एक पत्रही मिळाले होते. त्यात धमकीही देण्यात आली होती. या गाडीवर खोटा नंबर टाकण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी या कारच्या खऱ्या मालकाचा शोध लावला होता. ही कार चोरून आणल्याचेही पोलीस तपासात उघड झाले होते. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही कार चोरून आणल्याचे उघडकीस आले आहे. अंबानी यांना केंद्र सरकारने झेड प्लस ही सुरक्षा दिली आहे. तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षाव्यवस्थादेखील काटेकोर आहे.  

मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेरील स्फोटके ठेवलेल्या गाडीची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाबाहेरची स्फोटकांनी भरलेली गाडी फक्त एक ट्रेलर आहे. मोठे चित्र अजून समोर यायचे आहे, असे जैश-उल-हिंदने म्हटले होते. 'अंबानी यांच्या घराजवळ गाडी सोडणारा सुरक्षित ठिकाणी पोहोचला आहे, असेही नमूद करण्यात आले होते. 

जैश-उल-हिंद या संघटनेनेच दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासूनच ही संघटना समोर आली आहे. जैश-उल-हिंद संघचनेचा हात असल्याचा पुरावा जोपर्यंत मिळाला नाही तोपर्यंत या तपासाबाबत कोणतेही निवेदन देणार नाही, तपास यंत्रणांना असा संशय आहे की, व्हायरल स्क्रीनशॉट हा तपास भ्रमित करण्याचा प्रयत्न असू शकतो, असे तपास यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख