अमेरिकी सैनिकांची आता घरी परतण्याची वेळ; जो बायडन यांची मोठी घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ११ सप्टेंबरपूर्वी अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य माघारी घेण्याची मोठी घोषणा आज केली.
us president joe biden says us will call back all troops from afganistan
us president joe biden says us will call back all troops from afganistan

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानातून ११ सप्टेंबरपूर्वी संपूर्ण सैन्य माघारी घेण्याची मोठी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आज केली. यामुळे अमेरिकेने पुकारलेल्या या दीर्घकालीन युद्धाची पुढील पाच महिन्यांमध्ये अखेर होणार आहे. अफगाणिस्तानातील युद्ध पिढ्यानुपिढ्या चालावे, असे आम्ही ठरवले नव्हते. आता आमच्या सैनिकांनी घरी परतण्याची वेळ आली आहे, असे बायडन यांनी म्हटले आहे. 
 
माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तातून सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सैन्य माघारीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचे सध्या सुमारे अडीच हजार सैनिक आहेत. बायडेन यांनी आज दूरचित्रवाणीवरुन अमेरिकेतील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, एकाच देशावर लक्ष देऊन हजारो सैनिकांना युद्धभूमीवर तैनात करणे आणि त्यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलरचा खर्च करण्याच प्रकार अतार्किक आहे. त्यामुळे हे दीर्घकालीन युद्ध संपविण्याची वेळ आली आहे. येत्या 1 मेपासून सैन्य माघारीची अंतिम प्रक्रिया सुरु होईल. 

दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारणे आणि दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे यासाठी आम्ही अफगाणिस्तानात उतरलो होतो. आमच्या देशावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्यांना शिक्षा करण्यास आम्ही तेथे गेलो होतो. आमचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, हे युद्ध पिढ्यानुपिढ्या चालवण्याची आमची योजना नव्हती. अफगाणिस्तानमध्ये राजकीय स्थैर्य निर्माण करणे, हे आमचे काम नव्हते. तालिबानबरोबर लढण्यापेक्षा आमच्या देशासमोर असलेल्या प्रश्‍नांचा सामना करणे अधिक आवश्‍यक आहे. जगभरात पसरलेले दहशतवादाचे जाळे नष्ट करण्यासाठी आम्ही काम करू, असे बायडेन यांनी सांगितले. 

अफगाणिस्तानात स्थैर्य निर्माण होण्याचा फायदा भारत, पाकिस्तान, रशिया, चीन आणि तुर्कस्तान या देशांना होणार आहे. यामुळे या शेजारी देशांनी अफगाणिस्तानमधील शांततेसाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इतर देशांनी अधिक सहकार्य करावे. रशिया, भारत, चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तान या देशांना अफगाणिस्तानमधील स्थैर्याचा थेट फायदा होणार आहे, असे बायडन यांनी नमूद केले. 

अल कायदा या दहशतवादी संघटनेने ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानात अद्यापही शांततामय वातावरण नाही. यामुळे अफगाणिस्तान सरकारबरोबर आम्ही चर्चा केली आहे. दहशतवाद्यांचा अमेरिकेला त्रास होणार नाही याची काळजी घेतली आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियाचेही ८० सैनिक माघारी जाणार आहेत. 

अफगाणिस्तानातील युद्धात अमेरिकेचे सुमारे एक हजार अब्जहून अधिक डॉलर खर्च झाले आहेत. या वीस वर्षांत अमेरिकेचे २ हजार ४५० सैनिक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. तसेच, २० हजार ७०० सैनिक जखमी झाले आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com