US Election 2020:मिशिगन राज्यात मराठी ठाणेदार बनले आमदार  - US Election 2020: Marathi Thanedar becomes MLA in the state of Michigan | Politics Marathi News - Sarkarnama

US Election 2020:मिशिगन राज्यात मराठी ठाणेदार बनले आमदार 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

ट्रम्प आणि बायडन यांच्या नावाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मराठी माणसांना सुखद धक्का देणारा एक विजय अमेरिकेच्या मिशिगन राज्यात झाला आहे

वॉशिंग्टन, : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटीक पक्षाचे जो.बायडन यांची निवड होईल असे आता तरी चित्र दिसते आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पराजय सामोरे जावे लागेल अशी माहिती माध्यमातून पुढे येत आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे म्हणूनच अमेरिकेसह जगाचे लक्ष लागले आहे. 

ट्रम्प आणि बायडन यांच्या नावाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मराठी माणसांना सुखद धक्का देणारा एक विजय अमेरिकेच्या मिशिगन राज्यात झाला आहे. या राज्यातून आमदार म्हणून बेळगावचे श्री. ठाणेकर हे निवडून आले आहेत. ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. 

कोरोना सारख्या संकट काळात ठाणेकर यांनी या राज्यात मोठे काम केले होते. तोंडाला मास्क बांधून नागरिकांना आधार तर देतच होते शिवाय मास्कचेही वाटप करीत होते. आपला उद्योग सांभाळतानाच ते सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या विजयाने प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. 

 अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय होण्याची शक्यता आहे. 

‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’साठी झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी आमदारकी मिळवली आहे. श्री ठाणेदार यांनी तब्बल ९३ टक्के मतं खिशात घालत ‘रिपब्लिकन पक्षा’च्या उमेदवाराचा पराभव केला आहे. श्री ठाणेदार यांचा २५ हजार मतांनी विजय झाला असून प्रतिस्पर्धी उमेदवाराला फक्त सहा टक्के मतं मिळाली.

 ठाणेदार यांनी दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दोन लाखांहून अधिक मतं मिळाली होती. “श्री फॉर व्ही” ही त्यांची प्रचारमोहीम चांगलीच गाजली होती.

मतपत्रिकांनी निकाल लांबविला 

अत्यंत तुल्यबळ ठरत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कालच्या तुलनेत आज मतमोजणीची गाडी थोडीशी पुढे सरकली. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांना विजयाच्या सीमेपर्यंत नेले असले तरी सीमापार होण्यासाठी त्यांना आणखी सहा इलेक्टोरल मतांची आवश्‍यकता आहे. 

बहुमतासाठी तब्बल ५६ मतांची आवश्‍यकता असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनीही विजय मिळण्याची आशा कायम ठेवली आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे प्रचंड प्रमाणात झालेले टपालाद्वारे मतदान हे यंदाच्या विलंबाचे प्रमुख कारण ठरत आहे. 

मतपत्रिकांची मोजणी, पेनसिल्वानिया राज्यात मतपत्रिका स्वीकारण्यासाठी वाढवून दिलेला तीन दिवसांचा अवधी, ट्रम्प यांची न्यायालयीन लढाई यामुळे निकालाबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. जाहीर होणारे हे निकाल प्राथमिकच असले आणि निवडणूक आयोग १० तारखेनंतरच अधिकृत निकाल जाहीर करणार असला तरी या प्राथमिक निकालानंतर चित्र स्पष्ट होते. यंदा मात्र तसे झालेले नाही. 

जॉर्जिया, पेनसिल्वानिया, उत्तर कॅरोलिना, नेवाडा या राज्यांमध्ये मतमोजणी सुरु असल्याने अधिकाऱ्यांनी प्राथमिक निकालही जाहीर केलेले नाहीत. अद्याप कोणत्याच उमेदवाराने २७० हा जादुई संख्या पार केली नसल्याने दोन्ही बाजूंचे समर्थक आशेवर आहेत.

अखेरचे वृत्त हाती आले त्यावेळी जॉर्जियामध्ये ९० हजार मतांची मोजणी बाकी होती तर, पेनसिल्वानियामध्ये ७१ टक्के मते मोजून झाली होती आणि अद्यापही साडे सात लाखांहून अधिक मते मोजण्याची प्रक्रिया सुरु होती. मतमोजणी सुरु असतानाही ट्रम्प यांनी कालप्रमाणे आजही ‘व्हाइट हाऊस’समोर जमलेल्या समर्थकांसमोर विजयाचा दावा केला. 

अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून मीच शपथ घेणार आहे. अध्यक्षपद ही काही राजकारण खेळण्याचे पद नाही. 
- ज्यो बायडेन, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार 

देशात फार मोठा गैरप्रकार सुरु आहे. माझ्या दृष्टीकोनातून मी आधीच विजयी झालो आहे. 
- डोनाल्ड ट्रम्प, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख