union minister for road and transport nitin gadkari tests covid19 positive | Sarkarnama

संसद अधिवेशनाला हजेरी लावलेले नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी संसद अधिवेशनाला हजेरी लावली होती त्यामुळे आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गडकरी यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मी स्वत: विलगीकरणात गेलो असून, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे. गडकरी हे  सोमवारी (ता.14) संसद अधिवेशनाला काही काळ उपस्थित होते आणि पहिल्याच रांगेत बसले होते. यामुळे आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. 

गडकरी यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गडकरी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,  मला अशक्तपणा जाणवत होता. माझ्या डॉक्टरांकडून याबाबत सल्ला घेतला. त्यानंतर मी कोरोना चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थनांमुळे माझी प्रकृती व्यवस्थित आहे. मी स्वत: विलगीकरणात गेलो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घ्यावी, अशी विनंती आहे. त्यांनी कोरोनाविषयीच्या उपाययोजनांचे पालन करावे. सुरक्षित रहा.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता गडकरी पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाआधी खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. यात अनेक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना झालेल्या खासदारांना अधिवेशनात प्रवेश दिला जात नाही. गडकरी यांनी अधिवेशनला हजेरी लावल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नेत्यांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाचे आज 23 हजार 365 नवीन रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर आज कोरोनामुळे 474 जणांचा बळी गेला आहे. तसेच, 17 हजार 559 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता 11 लाख 21 हजार 221 झाला आहे. राज्यात कोरोनामुळे एकूण 30 हजार 883 जणांचा मृत्यू झाला आहे. याचवेळी देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांवर पोचली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख