शेतकरी आंदोलनात विरोधी पक्षांची दुहेरी, लज्जास्पद वृत्ती समोर : रविशंकर प्रसाद - Union minister Ravishakar prasad Targets opposition parties over  Farmer Protest | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी आंदोलनात विरोधी पक्षांची दुहेरी, लज्जास्पद वृत्ती समोर : रविशंकर प्रसाद

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 डिसेंबर 2020

विरोधी पक्षांचं काम केवळ मोदी सरकारला विरोध करणं एवढंच आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली : शेतकरी कायदाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांचं काम केवळ मोदी सरकारला विरोध करणं एवढंच आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. 

रविशंकर प्रसाद, "आम्ही जे केलं, यूपीए सरकारही तेच करत होती. आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. जेव्हा यांचं राजकीय अस्तित्व संपत आलं आहे, त्यावेळी ते वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांची दुहेरी आणि लज्जास्पद वृत्ती समोर आली आहे."

राजकीय लोकांनी आमच्या आंदोलनात सहभागी होऊ नये. आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे, पण तरी देखील हे सर्वजण शेतकऱ्यांच्या आंदोलनात उड्या घेत आहेत. कारण त्यांना भाजप आणि नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याची आणखी एक संधी यानिमित्ताने मिळाली आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.   

हेही वाचा : आधी शरद पवारांचं पत्र वाचून तर घ्या : प्रफुल्ल पटेल
भंडारा : राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आमचे नेते शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी दिलेले पत्र खरं आहे. त्यात त्यांनी असं म्हटल आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये संशोधन करून व्यापाऱ्यांना सुद्धा यामधून खरेदी करण्याचा अधिकार देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना आज जे भाव मिळत आहेत, त्यापेक्षा जास्त भाव मिळतील. त्यामुळे पवारांच्या पत्रावर राजकारण करण्याआधी ते पत्र नीट वाचून तर घ्या, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

जिल्ह्यातील पवनी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री पटेल म्हणाले, शरद पवारांच्या पत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पर्यायी व्यवस्था जी आहे, त्याशिवाय दुसरी व्यवस्था असू नये, असेही त्यांचे म्हणणे नव्हते. भाजपच्या सरकारने मागील सत्रामध्ये जो कायदा मंजूर केला, तो अतिशय घाईघाईत केला, कुणाशी चर्चा न करता केला. संसदेत आम्हाला केवळ दोनच मिनिटे बोलण्याची संधी देण्यात आली. या कालावधीत कायद्याची दुसरी बाजू समजावून सांगणे अवघड होते. हे जाणूनबुजून करण्यात आले. कारण हा कायदा अस्तित्वात आणताना सरकारला मुळात कुणालाही विश्‍वासात घ्यायचे नव्हते आणि चर्चा तर मुळीच घडू द्यायची नव्हती. त्यामुळे हा अन्यायकारक कायदा अस्तित्वात आला आणि आज दिल्लीच्या सीमांवर दिसत असलेली विदारक स्थिती उत्पन्न झाली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख