गडकरींनी दिली स्वत:च्याच चुकीची कबुली; आधीपासून सुरु असलेलं काम माहितीच नव्हतं! - union minister nitin gadkari clarifies about his mistake within hours | Politics Marathi News - Sarkarnama

गडकरींनी दिली स्वत:च्याच चुकीची कबुली; आधीपासून सुरु असलेलं काम माहितीच नव्हतं!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 19 मे 2021

लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी आणखी १० कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्यावी. असे गडकरी म्हणाले होते.

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) संकटाचा सामना करण्यासाठी येणारी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरण (Vaccination) हाच एक मार्ग आहे. मात्र, देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यांनी अपुऱ्या लस पुरवठ्यावरुन केंद्रा सरकारवर टीका सुरु केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राला सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी आज पुन्हा एक ट्वीट करत त्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. 

गडकरी म्हणाले, ''देशांतर्गत कंपन्यांना लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावा, जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी आणखी १० कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्यावी. त्यांना देशात पुरवठा करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात. हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते,'' असे गडकरी यांनी सांगितले होते.

गंगेत मृतदेह ; मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

गडकरी यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. जयराम रमेश यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राची आठवण करुन दिली होती. ते म्हणाले होते की ''हेच मनमोहन सिंग यांनी १८ एप्रिलला सुचवले होते. पण त्यांचे बॉस ऐकतायत का?,'' असा टोला जयराम रमेश यांनी नितीन गडकरी यांना लगावला होता. 

 
मात्र, नितीन गडकरी यांनी आज ट्वीट करत सांगितले की, ''काल स्वदेशी जागरण मंचच्या वतीने आयोजित परिषदेत मी लस उत्पादनात वाढ करण्याची सूचना केली होती. मला माहिती नव्हते की माझ्या भाषणापूर्वी केंद्रीय रसायन व खते मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandavia) यांच्या मंत्रालयाने लस उत्पादन वाढवण्या संदर्भात निर्णय घेतला होता. त्यांनी कार्यक्रमानंतर लस उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली.

दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारु नका..''राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा...

गडकरी म्हणाले मंडाविया यांनी सांगितले की '' केंद्र सरकार 12 वेगवेगळ्या कंपन्यांची लस उत्पादन वाढविण्यासाठी मदत घेत आहे आणि या प्रयत्नामुळे लवकरच लस उत्पादन क्षमता वाढेल. काल मी सूचना करण्यापूर्वी त्यांच्या मंत्रालयाने हे प्रयत्न सुरू केले होता, याची मला कल्पना नव्हती. योग्य दिशेने वेळेवर निर्णय घेतल्याबद्दल मी त्याचे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करतो. असे गडकरी म्हणले.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख