भाजपने फासे टाकले...अमित शहांचा थेट नितीशकुमारांना फोन - union home minister amit shah talks to chief minister nitish kumar on phone | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

भाजपने फासे टाकले...अमित शहांचा थेट नितीशकुमारांना फोन

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची निकालाची उत्सुकता असून, चालू मतमोजणीत  महाआघाडीपेक्षा राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे पारडे जड दिसत आहे.  

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) सर्वांत मोठा धक्का बसला आहे. मात्र, भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडेच राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात भाजपकडून वेगळेच संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सायंकाळी थेट मुख्यमंत्री नितीशकुमारांना फोन केला.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली. आज निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

मतमोजणीत सायंकाळी सातपर्यंत एनडीएला एकूण 122 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा चारने कमी झालेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा तीनने वाढल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू  41 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 72 जागा होत्या. भाजप 74 जागा, राष्ट्रीय जनता दल 75, काँग्रेस 20 जागा असा कल दिसत आहे. 

जेडीयूचे नेते पक्षाच्या जागा कमी झाल्याचे मान्य करीत असले तरी ब्रँड नितीशला धक्का पोचला नसल्याचे सांगत आहेत. दुय्यम स्थानी असलेला भाजप आता पहिल्या स्थानी पोचल्याचे चित्र आहे. याचवेळी राज्यात जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.  भाजपला जास्त जागा पदरात पडतील असे चित्र असून, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील का, याबाबत भाजपच्या गोटातूनच साशंकता व्यक्त केली जात आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी या प्रकरणी सूचक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेमुळे या निवडणुकीत आम्ही तरलो. सरकार स्थापना आणि नेतृत्वाच्या निर्णयावर सायंकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार राहणार हे आधीच ठरलेले असताना आता नेतृत्वाची चर्चा कशाला असा प्रश्न विचारला जात आहे.  

महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाबाबत वाद होऊन एनडीएतील घटक पक्ष असलेली शिवसेना बाहेर पडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी करुन अखेर शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरुनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. 

बिहारमधील घटनाक्रम पाहता भाजप आणि जेडीयूमध्ये जागांचे समसमान वाटप झाले. दोन्ही पक्षांच्या कोट्यातून घटक पक्षांना जागा देण्यात आल्या. मात्र, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी नितीशकुमारांनी विरोध करीत एनडीएशी फारकत घेतली. चिराग यांनी भाजपची फूस असल्याची चर्चा तेव्हापासून सुरू झाली. चिराग यांच्या पक्षाकडून भाजपच्या अनेक नेते मैदानात उतरले होते. महत्वाचे म्हणजे चिराग यांनी भाजपला पाठिंबा आणि नितीशकुमारांना विरोध अशी भूमिका घेतली होती. 

आता राज्यातील मतमोजणीचा कल पाहता भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष दिसत आहे. मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपकडून पाळला न गेल्यास नितीशकुमार हे इतर पर्यायांची चाचपणी करतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहे. भाजपने मुख्यमंत्रिपद न दिल्यास नितीश हे महाआघाडीला बाहेरुन पाठिंबा देऊ शकतात, अशी शक्यताही काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत. असे घडल्यास महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे भाजपला विरोधी बाकावर बसवले तसे नितीश बिहारमध्ये करु शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. 

महाराष्ट्रातील अनुभव पाहता ताकही फुंकून पिण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री नितीशकुमारांना फोन केला. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, भाजपचे संख्याबळ वाढल्याने नितीशकुमारांवर दबाव टाकण्याची रणनिती भाजपकडून सुरू झाली असल्याचे समजते. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख