हे शिवसेनेसाठी दुर्दैव आहे : संजय राऊत  - This is unfortunate for Shiv Sena: Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

हे शिवसेनेसाठी दुर्दैव आहे : संजय राऊत 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण होताना दिसते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर आरोप होतात. त्यावर बोलायचे आणि भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा शिवसेना किंवा सरकारमधील मंत्री का बोलत नाहीत, या प्रश्‍नावर खासदार संजय राऊत यांनी "हे दुर्दैव आहे,' अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण होताना दिसते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर आरोप होतात. त्यावर बोलायचे आणि भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा शिवसेना किंवा सरकारमधील मंत्री का बोलत नाहीत, या प्रश्‍नावर खासदार संजय राऊत यांनी "हे दुर्दैव आहे,' अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. 

खासदार संजय राऊत हे एका वृत्तवहिनीवरील चर्चेत बोलत होते, त्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. याच प्रश्‍नावर ते पुढे म्हणाले की "मी ठरवलं होतं की आता कुठल्याही वादात पडायचं नाही. सरकार नीट चाललं आणि पुढेही नीट चाललं पाहिजे. सरकारशी संबंधित प्रश्‍नांवर प्रमुख मंत्र्यांनी उत्तर दिली पाहिजेत. सरकारवर कोणी हल्ला केला, तर सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षातील लोकांनी प्रतिहल्ला करून त्याला उत्तर दिले पाहिजे. पण तसं होताना दिसलं नाही; म्हणून मी आपल्या आपद्‌ धर्मानुसार हे सरकार आपले, हा पक्ष आपला आहे, ही माणसं आपली आहेत. म्हणून त्यांच्यासाठी जे सत्य आहे, ते सांगण्यासाठी पुढे आले पाहिजे; म्हणून मी त्याला उत्तर देत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर आरोप होऊनही शिवसेनेचे मंत्री गप्प का आहेत? या प्रश्‍नावर राऊत म्हणाले की, कुणीही उठतो आणि आपल्यावर हल्ला करतो. ठाकरे कुटुंबाविषयी बोलतो, त्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बोलले पाहिजे. पण सत्तेत गेल्यावर आक्रमकपणाची धार बोथट होते, हे खरे आहे. पण, संघटनेत असलेले लोक हे आक्रमक असतात. त्यांनी तसेच मंत्र्यांनी या विषयावर अलिप्त राहू नये. ही मंत्रिपदे शिवसेनेमुळे मिळाली आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी सुसाट येऊन प्रतिहल्ला केला पाहिजे. ते यापुढे आरोप करणाऱ्यांना उत्तर देतील, असा आशावाद राऊत यांनी व्यक्त केला. 

सामनामधील "रोखठोक' सदरामध्ये जे लिहिले आहे, ते योग्यच आहे, त्यामुळे त्यापासून मागे हटण्याचा प्रश्‍नच नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

'पहाटेचा कोरोना' 

राज्य सरकारच्या स्थिरतेविषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, कोरोना विषाणूचा संसर्ग एकदा होऊन गेला का तो माणूस निश्‍चिंत असतो. त्याप्रमाणे राज्यात पहाटेच्या वेळी एक कोरोना होऊन गेला. त्यामुळे राज्य सरकारमधील कोणालाही आता दिवसाढवळ्या कोरोना होणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाला चालवायचे आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख