उद्धवजी घराबाहेर पडा; अन्यथा ठाकरे नावावरील लोकांचा विश्‍वास उडेल  - UddhavJi leave the house; Otherwise, people will lose faith in Thackeray's name | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धवजी घराबाहेर पडा; अन्यथा ठाकरे नावावरील लोकांचा विश्‍वास उडेल 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे आश्रु पुसा.

पुणे : मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण, आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन (online) बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा "ठाकरे' नावावरील विश्वास उडेल, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. 

गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे, त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काढून ठेवलेली पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला सरकारची मदत अत्यंत आवश्‍यकता आहे. 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु सध्याच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे, त्याला शेताच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याची गरज आहे. अशा वेळी नेहमीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने पंचनाम्याचा आदेश देऊन भागणार नाही, तर या संकटातून पुन्हा उभे राहण्यासाठी त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन हे काम करावे, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी ट्विटमधून केली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात घराबाहेर पडून पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. पण, ठाकरे यांनी पुणे दौरा सोडता घरातूनच कारभार हाकला आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. पण, मनसेने आत्तापर्यंत ठाकरे यांच्यावर थेट टिका केली नव्हती. 

तोच धागा पकडून नांदगावकर यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्रीजी आतापर्यंत तुमच्यावर थेट टिका करण्याचे टाळत आलो आहे. आता मात्र शेतकऱ्यांचे आश्रु तुम्हाला ऑनलाइन पुसता येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही घराबाहेर पडा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांचे आश्रु पुसा. त्यांना तातडीने आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा ठाकरे नावावर असणारा विश्‍वास उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करणार का, याकडे तेथील जनतेचे लक्ष लागले आहे. 

Edited By vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख