मोठी बातमी : लाॅकडाऊन लगेच उठणार नाही; हळूवारपणे निर्णय घेऊ ; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती - Uddhav Thakeray addresses state about coron situation | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : लाॅकडाऊन लगेच उठणार नाही; हळूवारपणे निर्णय घेऊ ; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 30 मे 2021

शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी अद्याप काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अद्याप ही संख्या खाली आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे स्पष्ट करत बारावीसाठी काय धोरण ठरवायचे, हे लवकरच जाहीर करू, असे ठाकरे यांनी जाहीर केले. (Uddhav Thaceray addresses state on corona situation) तसेच लाॅकडाऊन लगेच शिथिल होणार नाही, हे देखील त्यांनी ठामपणे सांगितले. तो पंधरा दिवसांनी वाढविणार असल्याची त्यांनी घोषणा केली. 

बारावीच्या परीक्षेसाठी केंद्र सरकारनेही धोरण ठरवायला हवे. ही परीक्षा पुढील आयुष्यावर परिणाम करणारी असते. त्यामुळे या परीक्षेचा निर्णय संपूर्ण देशासाठी धोरण ठरवून घ्यायला हवा. अशा वेळी केंद्र सरकारने निर्णय घ्यायला हवा. हा निर्णय देशभर समान असायला हवा, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने केलेल्या कामाचे कौतुक आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे. ग्रामीण भागात अद्याप रुग्णवाढ होत आहे. शहरातील वाढ थांबली आहे. कोरोनामुक्त गाव, असा निर्धार करायला हवा. माझे घर कोरोनामुक्त राहिले तर माझी वस्ती कोरोनामुक्त राहिल आणि त्यातून माझे गाव कोरोनामुक्त आपोआप होईल.

ठाकरे यांनी हिवरे बाजार गावाचे उदाहरण देत तसे काम करण्याचा निर्धार प्रत्येक गावांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. हिवरे बाजारचे पोपटराव पवार आणि तेथील सरपंचाप्रमाणे काम व्हायला हवे. त्यासाठी कोरोनामुक्त गाव मोहीम आजपासून राबविणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली.   

ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

शेतीच्या कामांवर बंधने आपण टाकलेली नाहीत. फक्त गर्दी टाळा आणि कोरोनाला पळवा, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेने मोठा तडाखा दिला आहे. अनेकांचे आप्तस्वकीय गमावले आहेत. अनेक बालके अनाथ झाली आहेत. केंद्र सरकारने त्यासाठी योजना जाहीर केली आहे. पण राज्य सरकारही अशा बालकांची जबाबदारी घेईल. या अनाथ बालकांना पावलोपावली मदत करेल. त्यासाठीची योजना लवकरच जाहीर करू, असे त्यांनी जाहीर केले. 

कोरोना संकट कमी होत असले तरी तातडीने रस्त्यावर येऊ नका. लाॅकडाऊन उघडा यासाठी अनेक जण आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत. मात्र तसे करू नका. रस्त्यावर यायचे असेल तर कोरोनादूत म्हणून उतरू नका तर कोरोनायोद्धे म्हणून उतरा. तिसऱ्या लाटेचे निमंत्रक म्हणून रस्त्यावर उतरू नका. निर्बंध लादणे हे कटू काम आहे. मला ते करावे लागते आहे. अजूनही आरोग्य व्यवस्थेत काम सुरू आहे. आपल्याला हळूवापरपणे एकेक गोष्टी उघडाव्या लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आॅक्सिजन टंचाईच्या काळात घाम फुटावा, अशी परिस्थिती होती. त्यात म्युकरमायकोसिसने डोके वर काढले आहे. त्यासाठी राज्य सरकारने काय उपापयोजना केल्या, याची माहिती त्यांनी दिली. डाॅक्टरांचा टास्क फोर्स यासाठी तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची तिसरी लाट सांगून येणार नाही. पहिली लाट ही ज्येष्ठ नागरिकांना जास्त प्रभावित करणारी होती. दुसरी लाट ही मध्यमवयीन गटावर परिणाम करणारी ठरली. तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त संसर्ग करेल, असा अंदाज आहे. मात्र ही लाट येऊच नये, अशी माझी प्रार्थना आहे. त्यासाठी प्रसिद्ध बालरोगतज्ञ सुहास प्रभू यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स तयार करत आहोत. सरकार म्हणून कुठे कमी पडणार नाही, याची आपण दक्षता घेत आहोत.

45 वर्षे वयावरील जबाबदारी केंद्राची आणि 18 ते 45 नागरिकांची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यामध्ये 18 ते 45 वयोगटात सहा कोटी लोक आहेत. त्यांच्यासाठी बारा कोटी लस घेण्याची सरकारची तयारी आहे. मात्र ती लस मिळण्यात अडचणी आहेत. अजूनही उत्पादनक्षमता तेवढ्या प्रमाणात नाही. जूनमध्ये हा पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले होते. जूनमध्ये जास्तीतजास्त लसी घेऊन आपण नागरिकांना सुरक्षित करणार आहोत. राज्यात आतापर्यंत सव्वा दोन कोटी नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. हे लसीकरण पुन्हा जोमाने सुरू केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख