उद्धव ठाकरेंनी एकहाती करून दाखवलं...शिवसेनेला तरुन नेलं!

शिवसेनेचा आज वर्धापनदिन. ती आज 54 वर्षाची झाली. भाजप, कॉंग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी. शिवसेनेला अशा आघाड्या आणि युती करण्यात कधी अडचणआली असे दिसत नाही. कॉंग्रेसचं तर ते पिल्लूच असेही एकेकाळी बोललं जायचं. व्हाया भाजप प्रवास करून आज तीच शिवसेना कॉंग्रेसच्या हातात हात घालून सत्तेवर आली. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. हा ही योगायोगच!
uddahv thackray
uddahv thackray

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्यासह काही मंडळींनी मिळून संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेला नाव काय द्यायचे असा विचार सुरू असताना प्रबोधनकारांनी छोटं पण, ठसठशीत नाव दिलं शिवसेना! पाच दशकापूर्वी लावलेलं हे रोपटं इतकं मोठ होईल हे स्वप्नही त्यावेळी कदाचित पाहिलं गेलं नसेल. शिवसेना संघटनेची निशाणी होती वाघ आणि शिवरायांचा भगवा ध्वज!

प्रारंभी मुंबई आणि ठाण्यापूरती मर्यादीत असलेली शिवसेना महाराष्ट्रभर कधी पसरली हे कळलंच नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं खऱ्या अर्थाने जाळं विनलं. आपल्या ज्वलंत विचारांनी लाखो तरूणांची फौज उभी केली. अगदी सामान्य कार्यकर्ते किंवा बिनचेहऱ्यांची माणसं आणि पोरं ही या पक्षाचे शक्तीस्थळ होतं. याच बिनचेहऱ्यांना बाळासाहेबांनी घडविले. सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रीच काय मुख्यमंत्रीही करून दाखविले. ही ताकद असणारे नेते खूप कमी पाहण्यास मिळतात.

ज्या पक्षाला वारसा आहे. जो पक्ष समुद्र असतो त्या पक्षात काम करणे तुलनेने सोपे असते. पण, स्वत:ची संघटना स्थापन करून तिला पक्ष करणे सोपे नक्कीच नव्हते. शिवसेनेच्या इतिहासावर आतापर्यंत बरंच लिहलं गेलंय. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी उगळण्यापेक्षा शिवसेना 54 वर्षे कशी टिकली. अनेक वादळातही ती कशी तरली. तिला संपवायला निघालेल्यांना ते का शक्‍य झाले नाही ? याचा विचारही आजच्या वर्धापनदिनी करणे महत्वाचे ठरेल.

राजकारणात सर्वचजण रंग बदलतात. तसे शिवसेनेनेही ते बदलले. म्हणजेच अनेक तडजोडी केल्या. बाळासाहेब ज्या कॉंग्रेसवर गेली पंचवीस वर्षे सडकून टीका  करीत होते. सोनिया गांधींना पाण्यात पाहत होते. त्याच कॉंग्रेसला म्हणजेच सोनियाबाईंच्या सासूनी आणलेल्या आणीबाणीला त्यांनी साथ दिली होती. जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, कॉंग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल शिवसेनेला अशा आघाड्या आणि युती करण्यात कधी अडचण आली असे 
दिसत नाही. शिवसेनेचा उपयोगही राष्ट्रीय पक्षांनी म्हणजेच कॉंग्रेस आणि भाजपने करून घेतला. कॉंग्रेसचं तर ते पिल्लूच असेही एकेकाळी बोललं जायचं. आज  फिरावून तीच शिवसेना कॉंग्रेसच्या हातात हात घालून सत्तेवर आली. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले मनोहर जोशी. 1995 मध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीने सत्ता मिळवली होती. त्यानंतर म्हणजे 19 वर्षे ही युती टिकली. आता 24 वर्षांनी (2019 मध्ये) शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आले आहे पण ते कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने. हे बदलत्या राजकारणाचे वैशिष्ठ्यच म्हणावे लागेल. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे, की शिवसेना कॉंग्रेसपासून जशी दूर गेली तशी भाजपपासूनही दुरावली. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरे यांनाही फायदेतोटे चांगले कळतात. कधी कोणाचा हात धरायचा आणि कधी झटकायचा हे चांगले जमते. बाळासाहेब ज्यावेळी पक्षाचे नेतृत्व करीत होते तेव्हा भाजपने एकदा साथ सोडली  होती. त्यानंतर 2014 मध्येही तसेच केले होते. पुढे उद्धव यांनीही भाजपप्रमाणेच केले.

शिवसेनेचे सिंहावलोकन केल्यास असे दिसून येते की, पक्षाला छगन भुजबळ असो की नारायण राणे, की गणेश नाईक. जय महाराष्ट्र करणारे कधी पक्षात  परतले नाहीत. पण जे जे शिवसेनेला संपवायला निघाले होते त्यांना या पक्षाने सरळ केले आहे. पक्ष संपला, आता काही खरे नाही, असे म्हणणाऱ्यांचा नेहमीच भ्रमनिरास झाला. फिनीक्‍स पक्षाप्रमाणे अनेकदा शिवसेनेने भरारी घेतली आहे. याला कारण आहे ते म्हणजे बाळासाहेबांनी केलेली पक्षाची बांधणी. अर्थात भक्कम नेटवर्क.

बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी पक्ष हलू दिला नाही. बाळासाहेबांना जसे काही लोक सोडून गेले तसे उद्धव यांच्यापासूनही लोक दूर गेले. परममित्रांनी दोस्ती तोडली पण, त्याची फिकीर त्यांनी कधी केली नाही. सर्वांनाच उद्धव ठाकरे पुरून उरले. शांत आणि संयमी नेतृत्व असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला झाला.  2014 मध्ये भाजपने मोदी लाटेत दगाफटका केला. युती तोडली पण, बहुमत मिळाले नाही. शेवटी भाजपला शिवसेनेच्याच दारात जावे लागले. पाच वर्षे काहीसे शांत राहात उद्धव ठाकरे आडाखे टाकत राहिले. पुढे 2019 मध्ये भाजपबरोबरच युती केली. निवडणुका एकत्र लढल्या. यावेळीही भाजपला वाटत होते महाराष्ट्रात बहुमत मिळेल पण नाही मिळाले. जो भाजप मोदी लाटेत स्वबळावर येऊ शकला नाही तो आता कसा स्वबळावर सत्ता मिळवणार, याचा विचार व्हायला हवा होता. भाजपला अतिआत्मविश्वास नडला. शिवसेनेची सोबत नसेल तर भाजप महाराष्ट्रातील सत्तेचे स्वप्न पुर्ण करू शकत नाही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे.

2019 मध्ये शिवसेनेने 2014 चा वचपा काढला अशी नेहमीच चर्चा होते. ते काहीसे खरेही आहे. शिवसेनेने थेट भाजपचा हात झटकला आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर हात मिळविणी केली. म्हणजे पक्ष अडचणीत येईल असे चिन्ह दिसू लागताच विरोधकांना धडा शिकवायला प्रसंगी शत्रू पक्षाच्या गळ्यात गळा घालयला ती मागेपुढे पाहत नाही हे दिसून आले. कॉंग्रेसबरोबर शिवसेना कधी जाईल असे स्वप्न कोणी पाहिले होते का ? मात्र घडले. राजकारणात म्हणूनच 
कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो म्हणतात ते उगाच नाही.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. त्यांच्याविषयी लोकांना सहानुभूती आहे. ते पाच वर्षे टिकले तर नक्कीच वेगळं काही तरी करून दाखवलीत असा विश्वास लोकांना वाटतो. ठाकरे घराण्याची तिसरी पिढीही राजकारणात आहे. नव्या चेहऱ्यांचा राजकीय क्षितीजावर उदय होत आहे. राजकारणही बदलत आहे. तशी शिवसेनाही बदलली. काळ आणि वेळेचे भान या नेत्यांकडे आहे. शिवसेना एक चळवळ आहे. ती कधी संपेल असे वाटत नाही. शिवसेना जे ठरविते ते करून दाखविते. पुढच्यांच्या चाली ओळखून पाऊल टाकते. त्यामुळे ती यशस्वी होताना दिसते आहे असे म्हणावे लागेल. शेवटी राजकारणातला व्यवहारही महत्त्वाचा असतो. हा व्यवहार कसा हातायळायचा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगले ठाऊक आहे. ते शांत आणि संयमी आहेत. त्याचा शिवसेनेला फायदा होईल की तोटा ? हे येणारा काळच ठरवेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com