मुख्यमंत्र्याचे धोक्याचे इशारे खरे ठरले... - Uddhav Thackeray Are we heading for the lockdown again? | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्याचे धोक्याचे इशारे खरे ठरले...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

राज्याचे विरोधी पक्षनेतेही ‘मास्क’ न लावता सार्वजनिक कार्यक्रमात वावरतात.

मुंबई  : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने आपण निघालो आहोत काय? अशी भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, पुन्हा लॉक डाऊन नको असेल तर नियमांचे काटेकोर पालन करा! पण लोक बेपर्वा होऊन गर्दी करीत आहेत, मास्क न लावता वावरत आहेत, उत्सव साजरे करीत आहेत. बंगालातील जाहीर कार्यक्रमांत गृहमंत्री व त्यांचे सहकारी ‘मास्क’ न लावता किंवा ‘मास्क’ नाकाखाली ओढून ममतादीदींवर हल्ला करताहेत. अशात कोरोनाच्या विषाणूने त्यांना दगाफटका केला तर कसे व्हायचे? असा सवाल शिवनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेतेही ‘मास्क’ न लावता सार्वजनिक कार्यक्रमात वावरतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी तर चांगले नाहीच, पण नेते म्हणून जनतेला कोणती दिशा देत आहात? प. बंगालात भाजपला विजय मिळवायचा आहे हे ठीक, पण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत.  आम्हाला त्यांच्या तब्येतीची चिंता वाटते म्हणून हे सांगायचे. ‘मास्क’ हीच लस आहे याचा विसर लोकांना पडला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वारंवार जे धोक्याचे इशारे दिले ते खरे ठरले आहेत. ‘हे उघडा आणि ते उघडा, नाहीतर आंदोलने करू,’ अशा धमक्या विरोधक देत राहिले, कोरोना नियमांचेही राजकारण केले गेले. त्याचा फटका जनतेला व राज्याला बसत आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात... 

राजकीय मेळावे, लग्न समारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसत नाहीत. लोक बेपर्वा का आहेत? परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील असा इशारा कोरोनासंदर्भातील राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. निदान डॉक्टरांचे तरी ऐका!

मुंबईच्या जुहू चौपाटीवर 14 तारखेस तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी अशी उसळली की, मास्क न लावता, शारीरिक अंतराचे भान न राखता गर्दीने उच्चांक मोडला. त्या प्रेमी जिवांच्या चेंगराचेंगरीत कोरोना विषाणूही जणू स्वर्गवासी झाले. हे असे ठिकठिकाणी सुरूच आहे. या सगळय़ा पायमल्लीमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे.

देवळे उघडली, लोकल ट्रेन्स सुरू झाल्या, बाजार उघडले; पण लोक नियमांचे पालन करायला तयार नाहीत, हे कसे चालेल? सार्वजनिक ठिकाणी परस्परांतील अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे ही बंधने पाळली गेलीच पाहिजेत. मात्र अनेकदा ती एका बेफिकिरीने झुगारून देताना लोक दिसतात. दोनच दिवसांपूर्वी ‘सैराट’मुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिने नांदेड येथील एका उत्सवात हजेरी लावली. तेव्हा तिला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. त्यावेळी कोरोना नियमांचा सपशेल फज्जा उडालेला दिसला. सांगलीतील विटा येथे देखील असेच घडले. हेच होणार असेल तर कोरोना विषाणूला अटकाव बसणार कसा?  

Edited  by :  Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख